Total Pageviews

Showing posts with label दिनविशेष. Show all posts
Showing posts with label दिनविशेष. Show all posts

Saturday, 7 May 2016

कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजी महाराजांनी चौलजवळ सन १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. इ.स. १६५९ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. इ.स. १६८० तुकोजीं आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत.

आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

छत्रपति संभाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दी कासमकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी केला या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. इ.स. १६९४–१७०४ च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनाऱ्याचे राजे‘ अशी घोषणा केली. मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली, त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.

कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांना राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे इ.स. १७०७ मध्ये छत्रपती शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात वाद निर्माण झाला. पण अखेर शाहू महाराजांची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहू महाराजांना मिळाली. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही उलट तेच कान्होजींच्या कैदेत पडले. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजी विश्वनाथ ह्या आपल्या पेशव्यास त्यांच्याविरुद्ध धाडले. बाळाजींनी कान्होजींबरोबर तह करून त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात सामील करून घेतले आणि काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य मिळवून दिले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात होते.

४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०,००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
प्रमुख लढाया

इ.स. १७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
इ.स. १७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
इ.स. १७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (खांदेरी) कब्जा.
इ.स. १७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. ३०,००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
इ.स. १७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
इ.स. १७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०,००० रुपयांची खंडणी वसूल केली.
इ.स. १७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
इ.स. १७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
इ.स. १७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा एकत्रित हल्ला असफल.
इ.स. १७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.

कान्होजींनी मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज ई. परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजीं आंग्रेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले.

कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक!

दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी सरखेल कान्होजी आंग्रे मरण पावले. वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’! त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.

अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन
एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.

संदर्भ :
कान्होजी आंग्रे(कादंबरी) लेखिका देसाई मृणालिनी
कान्होजी आंग्रे (कादंबरी-भाषांतर) लेखक: पु. ल. देशपांडे Publisher: सन पब्लिकेशन्स
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजी कादंबरी
सेना सरखेल कान्होजी आंग्रे (चरित्र) लेखक:नाईक कृष्णकांत विद्यार्थी प्रकाशन,
विकिपीडिया आणि देशपांडे, सु. र.
Burrows, C. B., Pub. Representative Men of Central India, Bombay, 1902.
Sen, S. N. The Military System of the Marathas, Calcutta, 1958.
दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, अलिबाग, १९३९ आणि दैनिक मराठा लेख

Thursday, 5 May 2016

शिवा काशीद

वीर शिवा काशिदांचा जन्म ५ मे १६६० रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा न्हावी आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत

Monday, 2 May 2016

महादजी शिंदे

महादजी शिंदे

पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३० -१२ फेब्रुवारी
१७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
सैनिकी कारकीर्द
दक्षिण भारत
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
उत्तर भारत
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री
मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.
ग्वालहेरचे शासक
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.
पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.
पहिले इंग्रज-मराठा युद्ध
मुख्य पान: पहिले इंग्रज-मराठा युद्ध
1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
वडगावची लढाई
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
सालबाईचा तह १७ मे १७८२
मुख्य पान: सालबाईचा तह
महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.