शिवप्रताप दिन
पौष वद्य चतुर्दशी शके १५७७, मंगळवार १५ जाने १६५६ रोजी जावळीचा चंद्रराव मोरे याचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली (जे.श) आणि लगोलग मकरंदगड,चांभारगड, चंद्रगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. जावळीचे हे घनदाट जंगल काबिज झाल्या नंतर महाराजांचे लक्ष हे समोरील भोरप्याच्या डोंगरावर गेले. याला ७/१२ च्या उताऱ्यात ‘रान आड़वा गौड़‘ असे एक नाव आहे, तसेच नुकत्याच उपलब्ध झालेल्या प्रतापदुर्गामहात्म्य ह्या ग्रंथात त्याचा ढोळपाळाचा डोंगर असाही उल्लेख मिळतो. जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंताना गड बांधून घेण्याची आज्ञा केली (शि.च.सा.ख-१०-पृ -५४). ह्या गडाचे नाव महाराजांनी ठेवले ‘किल्ले प्रतापगड‘.
आता आदिलशाही मुलखात महाराज चांगलच धुमाकुळ घालत होते विजापुरी दरबारात रोज एकामागून एक महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या येत होत्या. बड़ी बेगम म्हणजे मुहम्मद आदिलशहाची बायको आणि अली आदिलशहाची आई, हिचे मुळ नाव उलीलीया जनाबा, पण तिला दरबारात म्हणत असत ताजुल मुखद्दीरात किंवा बडी बेगम साहिबा, हिची सहनशक्ति संपली. शिवाजीचा बंदोबस्त आता केलाच पाहिजे हे तिने आता मनाशी पक्के करून टाकले. महाराजांवर चालून कोण जाणार यासाठी विजापुरचा दरबार भरला. पैजेचे विडे ठेवले गेले, एकाहून एक सरस असे मातब्बर सरदार त्यावेळी उपस्थित होते, परंतु कुणाचे ही पाउल पुढे धजेना एवढ्यात सगळ्या सरदारांमधून एक सरदार पुढे आला आणि तो म्हणजे अफजलखान म्हणजेच अब्दुलाखान भटारी (९१ क.ब-पृ ४३).
विजापूर दरबारातील अफजलखान हा शिवकालीन सुलतानी सत्तेचे दाहक प्रतिक आहे. क्रूर, कपटी, खुनशी, द्वेष्टा पण स्वतःच्या फायद्याचे असणारे राजकारण आणि व्यवस्थापन उत्तमपणे तडीस नेणारा अफजलखान, म्हणजे शिवकालातील सत्तेचा मूर्तिमंत धर्मांध चेहरा.अफजलखान ही खरी तर एक पदवी आहे ह्याचे खरे नाव अब्दुल्लाखान असे होते.विजापूरच्या दरबारातील मुदपाकखान्यात असणाऱ्या भटारणीचा हा पुत्र असावा असे दिसते.अज्ञानदासाच्या पोवाड्यात आणि संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्यात शिवाजीराजांच्या तोंडी जी वाक्ये दिली आहेत त्यावरून हे समजते की हा सामान्य कुळातला भटारी असावा .जवळ-जवळ सर्वच समकालीन मराठी व अमराठी साधने अफजलखानाला अब्दुल भटारी किंवा अफजल भटारी म्हणतात. औरंगझेबाने शहाजहानला ५७ साली लिहिलेल्या एका पत्रात अफजलखान हा रणदुलाखानाचा सेनापती असून त्याला बादशहा आदिलखानाने पुत्र म्हणवून मोठी दौलत दिली आहे असा एक उल्लेख आला आहे.
हे झाले लोकांचे मत पण अफजलखानाच्या अपयशाचे मुख्य कारण ठरणार होते ती त्याची घमेंड आणि त्याचा स्वतःवर आणि स्वतःच्या ताकदीवर असणारा प्रमाणाबाहेर आत्मविश्वास. अफजलखानाचे शिलालेख वाचू लागलो की याचा प्रत्यय येतो. विजापूरजवळ असणाऱ्या एका गावाला त्याने स्वतःचे नाव ‘अफजलपूर‘ असे दिले होते. तिथे आणि शहापूर इथे उपलब्ध झालेल्या शिलालेखात तो स्वतःला काही विशेषणे लावतो – “कातील -इ मुत्मरिरदान व काफिरान” म्हणजे बंडखोर आणि काफिरांची कत्तल करणारा आणि “शिकनन्दा -इ बुतान” म्हणजे मूर्ती पायासकट फोडणारा. अफजलखानाने मंदिरे फोडल्याचे अनेक पुरावे आहेत, शिवभारत आणि शिवकाव्यासारखे मराठीच नव्हे तर ४ जुलै १६५० (ग्रेगोरीअन) च्या चौलच्या पोर्तुगिझ टपाल पत्रात अफजलखानाला चौलचा मोकासा मिळाला असून त्याने तिथली सर्व हिंदू मंदिरे पाडल्याचा उल्लेख आहे.अफजलखानाने १६५९ पूर्वी कधीतरी तुळजाभवानीच्या देवळावरही आघात केला होता – काही बखरीत त्याने विजापूरहून येत असता तुळजाभवानी फोडीली, जात्यात भरडली वगैरे प्रक्षोभक उल्लेख आहेत परंतु सूक्ष्म निरीक्षण करता असे दिसते की अफजलखानाने मंदिरास उपसर्ग हा १६५९ पूर्वी कधीतरी केला आहे कारण शिवभारत,९१ कलमी बखर आणि शिवकाव्य हे सगळे अफजलखान निघाला की ज्याने मागे तुळजाभवानी/तुळजाम्बिका हिला उपद्रव दिला होता असा उल्लेख करतात.अफजलखानाने पंढरपुरच्या विठोबालाही त्रास दिल्याचे एका ६६ सालच्या महजरावरून दिसते.त्यात बडवेमंडळी “तो क्षेत्रास खाने आजम अफजलखानाची तसविस लागली” असा उल्लेख करतात. हे सर्व पुरावे समकालीन आहेत तेव्हा प्रत्येकाने विचार करावा इतके असूनही महाराष्ट्र देशात अफजल मेमोरिअल ट्रस्ट सारखे उपक्रम उभे राहतात.
या अफजलखानावर आदिलशहाचा भयंकर जीव दिसतो अफजलपूर आणि शहापूर या दोन्ही शिलालेखात आदिलशाहने त्याच्या कडून ह्या दोन गावांचा मोकासा देताना काही वचने घेतली आहेत की हिंदुना अमानुष त्रास देणार नाही तसेच कुणीही हिंदू निपुत्रिक मेल्यास त्याची संपत्ती सरकारात जमा न करता ती त्याच्या वंशजांना देईन. ५२ सालचे हे लेख आहेत म्हणजे पुढे ७ वर्ष त्याने काय केले हे जरा प्रकाशात आणून पहिले तर सत्य अधिक कळेल . अफजलखान देखील स्वतःला संबोधताना अफजलखान मुहम्मद्शाही म्हणतो त्याला आणखी एक विशेषण लावलेले आढळते ते म्हणजे ‘फर्जंद-ए-रशीद‘ म्हणजे शहाणा पुत्र. ह्या अर्थी हा कारभारात चोख असावा. त्याचा शिक्का म्हणजे गर्वाचा फुगाराच !
“गर अर्ज कुनद सिपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तस्बिह आवाज आयद की अफजल अफजल”
याचा अर्थ असा की “आकाशाने उत्कृष्ट व्यक्तींची उत्कृष्टता आणि अफजलची उत्कृष्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल !! (अफझल हाच सर्वश्रेष्ठ आहे)”
अफजलखान आधी रणदौलाखानकडे नोकरीत होता. २१ ऑगस्ट १६३८ च्या एका पत्रावर ‘परवानगी अफजलखान’ असा एक शेरा आहे. म्हणजे पहा शिवाजीराजे ८ वर्षाचे होते तेव्हापासून हा अफजलखान राजनीतीचे डाव खेळत होता. त्याचा स्वभाव मुळतः क्रूर आणि कपटी होता हे त्याच्या अनेक कृत्यातून आणि पत्रातून दिसते.आपल्या जहागिरीत पेरणीला उशीर झाला म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या लिंगशेट्टीला दम भरताना अफजलखान लिहितो – “रयत आमचे पोन्गडे [मित्र] आहेती ” असेही तो म्हणतो तर पुढे “यैसे न करिता बाहीर बैसून राहिलीयामध्ये तुझी खैरियत नाही जेथे असशील व जेथे जासील तेथुणु खोदुणु काढूणु जो असिरा देवूणु ठेवूणु घेईल त्यास जनोबासमेत कातुणु घाणीयात घाळूणु पिलोन हे तुम्ही येकीन व तहकिक जाणणे “
ह्याच अफजलने कर्नाटक स्वारीच्या वेळी शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगनला तहासाठी आमंत्रण देवून त्याचा दगाबाजीने खून केला होता आणि शिऱ्याचे बलाढ्य संस्थान खालसा करून ते आदिलशाहीला मिळवले. मार्च १६५७ नंतर जेव्हा औरंगझेब विजापुरवर चालून आला असता कोंडीत सापडला तेव्हा दिल्लीहून मोठी फौज येऊ नये म्हणून खान मुहम्मदाने औरंगजेबाला सोडले आणि हे जेव्हा अफजलखानला समजले तेव्हा त्याने भर दरबारात थैमान घातले आणि बड्या बेग्मेशी संधान साधून दिवसाउजेड्या भर दरबारी खान महम्मदाची खांडोळी करवली. ह्याचा क्रूरतेचा उच्चांक आपल्या समोर येतो तो फ्रेंच साधनातून, Bartholomew Abe Carey नावाचा एक फ्रेंच प्रवासी १६७३ दरम्यान अफजलपूर जवळून प्रवास करीत असता त्याला तिथे अफजलखानाच्या बायकांच्या समाध्यांची काही कामे चाललेली दिसली आणि चौकशी करता त्याला समजले की स्वारीवर जाण्यापूर्वी अफजलखानाने आपल्या बायकांना इथे असणाऱ्या विहिरीत बुडवून मारले होते का तर त्याच्या पश्चात यांनी कुणाशी संधान साधू नये म्हणून.ती विहिर आजही आहे तिला सुरुंगबावडी असे म्हणतात. त्या ६३ कबरी आजही आहेत. Abe Carey’ने आपल्या प्रवास वर्णनात हे सर्व टिपून ठेवले आहे म्हणून आज आपल्याला हा इतिहास समजला.
ह्याच अफजलखानाने कनकगिरीच्या वेढ्यात ऐन वेळी कुमक मागी रोखली आणि थोरल्या शंभूराजांना दगाबाजीने ठार केले. असा हा अफजलखान भोसले कुळीचे एक कपाळ पांढरे करून आता मावळावर नामजद जाहला होता आणि जिजाऊसाहेबांच्या उरलेल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या मोठ्या भावाचे उसने फेडायचे होते.
खानाने मोहिमेचा विडा उचलला आणि कसम घेतली की ‘चढे घोड्यानिशी शिवाजीस कैद करून आणीन‘ (स.ब). खान नामजाद झाल्यावर बड़ी बेगम हिने ‘कुल वजीर उमराव‘ याना बोलवले आणि एक गुप्त मसलत केली. त्या मसलतीमधे फ़क्त २२ निवडक सरदार होते त्यांची नावे कविंद्र परमानंद यांनी शिवभारतात दिली आहेत ती अशी –
१) रुस्तामेजमान
२) सिद्दी हिलाल
३) मुसेखान
४) बाजी घोरपडे
५) झुंझारराव घाटगे
६) कोबाजी खरे
७) नाइकजी पांढरे
८) जीवाजी देवकाते
९) मंबाजी भोसले
१०) अंबर खान
११) याकुत खान
१२) हसन खान
१३) रणदुल्लाखान (धाकटा)
१४) अंकुश खान
१५) नाइकजी खराटे
१६) कल्याणजी जाधव
१७) काटे
१८) पिलाजी मोहिते
१९) शंकराजी मोहिते
२०) रहिम खान
२१) पहिलवान खान
२२) प्रतापराव मोरे.
यानंतर आपला मुख्य सेनापती अफजलखान यासोबत अली आदिलशहाने समयोचित भाषण केले (शि.भा.अ-१७\१).‘ शत्रूचे निवारण करणार्या निर्भय अश्या तुझ्याशिवाय शिवाजिला जिंकणारा अन्य कुणी मला दिसत नहीं (शि.भा.अ-१७\३०)’. आता इथे अजुन एक प्रश्न येतो की आदिलशहाने शिवाजीस पकडून आण की जमल्यास मारून टाक यापैकी काय सांगितले ? कविंद्र परमानंद यांच्या नुसार आदिलशहाने शिवाजिस पकडून आण असे अफजलखानास सांगितले आहे आणि खानने देखिल त्यास पकडून आणतो असे म्हटले आहे (शि.भा.अ-१७\३१-३७), पण समकालीन असा एक फारसी ग्रंथ आहे ‘तारीखे अली’ या ग्रंथामधे अली आदिलशहाचे चरित्र आहे. हा ग्रंथ बादशहच्या दरबारातील मानकरी नरुल्ला याने लिहला आहे.त्याच्या नोंदी प्रमाणे बादशहा अफजलखानास म्हणतो – “शिवाजीने वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकुल ऐकून न घेता त्याच्या जीविताच्या हंगामावर अग्नि टाकण्याशिवाय इतर काही करू नको” याचा सरळ सरळ अर्थ होता की शिवाजिस मारून टाक असा बादशहचा खानास हुकुम होता.
आदिलशहाने मोठे सैन्य खानासोबत दिले. खान विजापुरहुन वाईच्या रोखाने निघाला तेव्हाच मावळातील सर्व देशमुखांना खानास सामिल होण्याची फर्माने निघाली होती. एक फर्मान कान्होजी जेधे देशमुख याना आपल्या कारी या गावी आले. कान्होजी जेधे हे बारा मावळातील प्रतिष्ठित आसामी. कान्होजी आपल्या पाच मुलाना घेउन महाराजांकड़े दाखल झाले. खानास सामिल न होता कान्होजींनी महाराजांचा पक्ष स्वीकारला, आणाभाका घेतल्या आणि बेल-रोटी वर शपथ घेवून वतनावर पाणी सोडले ! (जे.श). ह्याला म्हणतात स्वामीनिष्ठा ! कान्होजींनी सगळ्या देशमुखांना एकत्र करून खानाच्या विरुद्ध उभे केले, महाराज कान्होजीस म्हणाले “वरकड़ मावळाचे देशमुख व तुम्ही एक जागा बसून त्यांचा मुद्दा मनास आणने“(जेधे करीना).यादरम्यान खंडोजी खोपड़े हे महाराजांचा पक्ष सोडून खानास सामिल झाले.
ह्या सर्व धामधुमित महाराज खानच्या हालचालिंवर बारीक़ लक्ष ठेवून होते. खान आता स्वराज्यात घुसणार हे महाराजांनी आणि त्यांच्या मुत्सद्दी मंडळींनी जाणले होते. यादरम्यान महाराजांनी राजगडी सदरेवर गोमाजी नाइक (बहुदा पानसंबळ), निळा॓पंत(डबीर ?), रघुनाथ बल्लाळ(अत्रे की कोरडे ?), नेतोजी पालकर या सर्व मंडळींना बोलावले. महाराजांनी आपला मनसुबा सांगितला महाराज म्हणाले- ‘ आपली कुल फौज लष्कर मुस्तेद करावे आणि जावळीस युद्ध करावे प्रतापगडास जावे’(सभा.ब) महाराजांचा हा निर्णय एकून सगळ॓च हादरले. सगळे शंका प्रकट करू लागले ” हे कठीण कर्म सिद्धीस गेले म्हणजे बरे“. मुत्सद्द्यांनी महाराजांना सल्ला दिला तह करावा. अफजल किती क्रूरकर्मा आणि देवद्वेष्टा होता हे सर्वास चांगले माहित होते. महाराजांनी सगळ्यांची समजुत घातली “सला केलियाने प्राणनाश होइल संभाजी राजियास जैसे मारले तसे आपणास मारतील, मारिता मारिता होईल ते करू” (स.ब). प्रतापगडास जावयाचे ठरवले आणि लगेच मोरोपंत, शामरजपंत रांझेकर, त्र्यंबकपंत याना प्रतापगडी दाखल होण्याचे हुकुम सुटले. खानाची हरएक खबर महाराज हेरांकरवी टाकोटाक घेत होते.
१६५९ च्या जून मधे खान वाईस पोहचला. त्याआधीच मे महिन्यात शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूंना पाठविलेले एक पत्र आहे की – ‘हिरडस मावळात जासलोडगड उस पडू लागला आहे तेव्हा अलंगा बांधोन मोहनगड नाव ठेवून गड वसवावा’. ही बहुदा जावळी युद्धाचीच तयारी असावी.राजांच्या मनात डाव आखून तयार होता आणि त्याप्रमाणे जर युद्धादरम्यान काही लोक या दिशेने जाऊ लागले तर त्यांना रोखण्याकरिता ही तयारी होती (शिवाजी सोविनियार.पृ १२८). वाईत दाखल झाल्या झाल्या खानाने लगेच मुलुख ताब्यात घ्यायला सुरवात केली. थोड्याच दिवसामधे शिरवळ, सुपे, रोहिड खोरे हा मुलुख खानाने कब्जात घेतला. आपण घाबरलो आहे हे खानास भासविण्यासाठी त्यास कोणीही प्रतिकार करू नए असे महाराजांनी अगोदरच सर्वांना सांगुन ठेवले असावे. महाराज ११ जुलै १६५९ या दिवशी जावळीस आले (जे.श) आणि थोड्याच दिवसात एक दुखद घटना घडली. विधीलिखित टळत नाही – भाद्रपद वद्य चतुर्दशी ५ सप्टें १६५९ या दिवशी सखलसौभाग्यसंपन्न सईबाई साहेब निवर्तल्या. हा कडू घास पचवून महाराज आगामी प्रतापगड पर्वाचे नवीन डाव आखत होते.
चंद्रराव मोरे याचा नातेवाइक प्रतापराव मोरे हा खानास सामिल झाला होता याला जावळीची खड़ा-न-खड़ा माहिती होती.त्यामुळे खानास हा महत्वाचा माणुस वाटला. पूर्ण तयारी करून खानास जावळी मधे उतरणे सोयीचे नव्हते.महाराज आता जावळीहुन प्रतापगडास आले होते. याच दरम्यान औरंगजेबाकडून महाराजांना पोषाख अणि शाही फर्मान आले (प.सा.सं- ले-७७५). यामुळे अफजलखान देखिल विचारात पडला. आता औरंगजेबाचा पाठींबा शिवाजीस मिळणार अशी सगळ्यांचीच धारणा झाली होती (प.सा.सं-ले-७९२). खानने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला महाराजांकड़े पाठवले.
आता कृष्णाजी भास्कर या नावाचा पेच जरा सोडवण्याचा प्रयत्न करुया – शिवकालात ३ ठिकाणी कृष्णाजी भास्कर असल्याचे पुरावे मिळतात. हे तिघेही वेगळे आहेत. पहिला कृष्णाजी भास्कर हा औरंगजेबाच्या नोकरीत असून त्याचा व त्याचा भाऊ दत्ताजी भास्कर याचा उल्लेख १६४८ सालच्या फर्मानात आहे (सिलेक्टेड डॉक्युमेंट्स ऑफ शाहजहान’स् रेन – क्र.७६). दुसरा कृष्णाजी भास्कर हा अफजलखानाचा वकील आणि वाई परगण्याचा हवालदार हा प्रतापगड पर्वात अफजलखानाचा वकील होता (शि.च.सा.६.पृ ६७) आणि तिसरा म्हणजे शिवाजी महाराजांचा कोकणातील अत्यंत प्रमुख असा अधिकारी ज्याचा उल्लेख शिवाजी राजांच्या आर्थिक व्यवस्थापन पत्रात आहे आणि हाच १६७४ दरम्यान Barthelemu Abey Carey ह्या फ्रेंच प्रवाश्यास चौल इथे भेटला. (फॉरीन बायोग्रफिज ऑफ शिवाजी). हे तिघेही एकच आहेत की वेगळे आहेत हा जर पेचच आहे. आमचे मित्र श्री. कौस्तुभ कस्तुरे यांनी याचा परामर्श घेतला आहे तो अवश्य वाचवा.
खानचा वकील आला ही बातमी कळताच सगळे अचंबित झाले. स्वराज्याचा घास घ्यायला आलेला खान एकदम वकील पाठवतो ! ही चाल महाराजानी चांगलीच हेरली. खानाचा निरोप कृष्णाजीने महाराजांना सांगितला. खान म्हणतो –
“तुमचे तीर्थरूप आणि आम्ही एकाच बादशहाचे चाकर आमचा आणि त्यांचा भाईचारा आहे,तुम्ही जे जे गडकोट घेतले ते सगळे परत द्यावे आमच्या भेटीस वाइस यावे“. खान महाराजांना वाई मधे बोलवत होता तेव्हा महाराज कृष्णाजीस म्हणाले – ‘भेट घेतो आमच्या मनात काही कपट नहीं खान साहेब जसा म्हणतील तसे करतो’ अशी खात्री महाराजांनी कृष्णाजीस करून दिली. आपली शिष्टाई सफल झाल्याचा आनंद कृष्णाजीस जाला. खानाला उत्तर देण्याकरिता महाराजांनी आपले वकील म्हणून गोपीनाथपंत बोकिल यांची निवड केली. हे गोपीनाथपंत बोकील म्हणजे शिवकालातील मोठी मातब्बर आसामी. शाहजी महाराजांचा आणि त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी तो काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख अढळतो. हे हिवरे गावचे कुलकर्णी होते. उत्तरात महाराज खानास जावळीत बोलवत होते. जावळीची गुहा हा काय प्रकार आहे हे खानास देखिल चांगले माहिती होते. खान या अगोदर वाईमधे १६४९ च्या सुमारास येउन गेलेला होता. खान जावळीमधे आल्यावर आपण त्याचा काटा काढू हे शिवाजी महाराजांना माहिती होते. खानास वाई सोडून जाऊ नये असे त्याच्या सल्लागारांनी सांगितले (प.सा.सं-ले-८१२) पण खानाने ऐकले नाही.त्याला गर्व झाला होता.त्याला आता काहीही करून महाराजांना भेटायाचे होते. आता महाराजांनी आपले उत्तर घेवून पंताजी काकांना पाठवले होते त्यांनी खानास सांगितले ते असे की –
“(महाराज म्हणतात)आम्ही तुम्हास वेगळ॓ नाही जसे तीर्थरूप महाराज तसे तुम्ही(इति), पण राजा बहुत भितो, वाई भेटीस धीर होत नाही खान वडिल आहेत मेहेरबानी करून जावळीस येउन भेट द्यावी“. पंताजी काका परतले नाहीत. खानाचा मनसुबा काय हे जाणून घेण्याकरीता मुक्काम करून राहिले.खानाचा मनसुबा पंताजीकाकास समजला (स.ब). पंत प्रतापगडी आले खानच्या मनात काय हे त्यानी महाराजांना सांगितले “खान दुष्टबुद्धि भेटीचे राजकारण करून दगा करून विजापुरास न्यावे असा बेत आहे (स.ब)”
भेटीस अतुर झालेला अफजलखान सगळा लवाजमा घेउन जावळीच्या रोखाने निघाला. जावळी मधे प्रवेश करताच त्यास आपण जावळी जिंकल्या सारखे वाटले (शि.भा.अ-२०\४८). रडतोंडी घाटाच्या वाटेने खान उतरला आणि कोयनेच्या तिरी पार गावी त्याने आपला तळ दिला (शि.भा.अ-२०\५०\ ९१ क.ब.क ३२). खान आलेला समजताच महाराजांनी पंताजी काकांना पाठवले. दोन्ही पक्षांचे वकील एकमेकांस भेटले.त्यानी भेटीचा तपशील ठरवला भेट. ही भेट सशस्त्र ठरली होती. सोबत १० अंगरक्षक आणावे आणि त्यांना भेटीच्या ठिकाणा पासून बाणाच्या अंतरावर ठेवावे. भेटीचा दिवस ठरला ‘मार्गशीष शुद्ध षष्ठी सह सप्तमी विकारी नाम संवत्सर शके १५८१ (१० नोवें १६५९) गुरुवार दुपारी आठवे तासी‘.
शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या १० अंगरक्षकांची नावे दिली आहेत ती अशी –
१) संभाजी कावजी
२) काताजी इंगळे
३) कोंडाजी कंक
४) येसाजी कंक
५) कृष्णाजी गायकवाड (बंकी अथवा बंककर )
६) सुरजी काटके (सूर्याजी काकडे ?)
७) जीवा महाला (संकपाळ)
८) विसाजी मुरुंबक
९) संभाजी करवर
१०) इब्राहीम सिद्दी बर्बर (शि.भा.अ-२१\७०-७३).
आणि अफजलखानाकडिल अंगरक्षकांची नावे दिली आहेत ती अशी –
१) बड़ा सय्यद
२) अब्दुल सय्यद
३) रहिमखान
४) पहिलवान खान
५) पिलाजी मोहिते
६) शंकाराजी मोहिते आणि इतर ४ जण (शि.भा.अ-२१\५७-६१).
महाराजानी भेटीचा शामियाना प्रतापगडाच्या वाटेवरील मेटावर / माचीवर सजवून ठेवला होता. खानाचे सैन्य पार घाटा नजीकच असल्यामुळे त्याना रोखण्याची जबाबदारी कान्होजी नाईक जेधे देशमुख याना दिली होती (जे.श). बुधवार रात्रौ ९ नोव्हेंबर रोजी महाराजांनी सदरेवर मुत्सद्द्यांना बोलावले; बैठक सुरु होताच महाराजांनी विचारले ‘भेटीस कैसे जावे ?‘. कृष्णाजी नाइक बन्की म्हणाले – ‘महाराज अंगाला सिल करणे‘ म्हणजे चिलखत घाला (पोवाडा). भेटीचा दिवस उजाडला महाराजांनी निघण्याची तयारी केली. खानही तयारीने निघाला होता. खानने चिलखत घातले नव्हते मात्र त्याच्याकडे १ कट्यार आणि १ तलवार होती. खाना बरोबर त्याचे सिद्दी हशम पथक पण निघाले पण कृष्णाजींनी त्यास आक्षेप घेतला व म्हणाले “शिवाजी राजास इतका सामान काय करावा भेट होणार नाही” (स.ब). खानाने मग हशम मागेच ठेवले. खान भेटीच्या ठिकाणी दाखल झाला. खान आल्याचे समजताच महाराज निघाले, निघण्यापूर्वी महाराजांनी सर्व जय्यत तयारी करून ठेवली होती. भेटही सशस्त्र होती त्यामुळ॓ दोघानी कृपाण (तलवार) सोबत आणलीच होती (शिवभारत). महाराजांनी सर्वाना सांगुन ठेवले होते “खानास मारून जय मिळाला तर मीच आहे मात्र युद्धि जर प्राणनाश जाला तर संभाजी राजियास राज्य देवून त्यांच्या आज्ञ॓त तुम्ही राहणे” (स.ब). महाराजांनी जासुदास पाठवून सर्व बारीक़ माहिती काढली. खानासोबत बड़ा सय्यद (सय्यद बंडा नव्हे !) आणि वकील कृष्णाजी भास्कर हे आहेत असे कळताच महाराज जागीच थांबले. त्यानी पंताजी काकांना निरोप पाठवला, महाराज म्हणाले – बड़ा सय्यद खानाजवळ आहे शंका वाटते (स.ब). पंताजी काकांनी लगेच कृष्णाजी भास्करास सांगुन बड़ा सय्य्दास दूर केले. महाराज शामियान्याच्या जवळ पोहचले. खानाने महाराज येत असल्याचे पाहिले.
शिवभारतकार म्हणतात –
कृपाण पाणीनैकेन विभ्राणोन्येनपट्टीशम|
स नंदकगदहस्त: साक्षाद्धिरीरुदैक्ष्यत || (शि.भा.अ-२१\२१)
ह्याचा अर्थ असा – एक हातात तलवार आणि दुसर्या हातात पट्टा धारण करणारा शिवाजी राजा नंदक व कौमोदकी गदा धारण करणाऱ्या प्रत्यक्ष विष्णु प्रमाणे दिसत होता.
मार्गशीष शुद्ध षष्ठी सह सप्तमी विकारी नाम संवत्सर शके १५८१ (१० नोवें १६५९) गुरुवार दुपार महाराजांनी शामियान्याच्या आत प्रवेश केला. दोन्ही पक्षातील वकिलांनी खान आणि महाराजांची ओळख करून दिली (९१ क.ब.क-३४). खानाने त्याची तलवार आपल्या वकीला जवळ दिली (शि.भा.अ-२१२५-२६). खानने महाराजांना आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरले. महाराज सुधा सावधपणे पुढे आले, महाराज मिठीत येताच खानने महाराजांची मान बगलेत दाबुन धरली आणि मग कट्यार उपसून महाराजांच्या पाठित वार केला. महाराजांनी चिलखत घातले होते त्यामुळ॓ खानचा वार वाया गेला. महाराज सावध होतेच ! आणि क्षणाचा ही विलंब न करता बहुयुद्धात निपुण असणाऱ्या शिवाजी राजांनी स्वतःस सोडवून आपल्या गंभीर ध्वनीने सबंध दरी दुमदुमवून सोडली आणि ‘हा वार तुला करतो तो घे‘ असे म्हणत आपल्या दोन्ही हातानी तलवार पेलीत त्यांनी तलवारीचे टोक खानच्या पोटात खुपसले (शि.भा.अ-२१\३९) खानाचा कोथळाच बाहेर आला. थोरल्या भावाचे उसने राजांनी फेडले. स्वराज्यावर आणि जिवावर बेतलेल्या संकटावर महाराजांनी आपल्या कर्तुतत्वगुणांनी मात केली. डच, इंग्रज, पोर्तुगीज, मुघल या सर्वानी महाराजांच्या या पराक्रमामुळे तर धसकाच घेतला आणि राजियानी चहु दिशास आपली कीर्ति प्रस्थापिली. खानाला मारल्याच्या नंतर शिवाजीराजांनी टाळ्या वाजवून जवळ असणाऱ्या काही शिपायांना नौबत वाजविण्याकरिता संकेत केला असा खुलासा नवीनच प्रकाशात आला आहे. नुकत्याच प्रकाशात आलेल्या प्रतापदुर्गामहात्म्य ह्या ग्रंथात ही माहिती मिळते.
आता काही प्रश्न येतात जसे –
महाराजांनी कृष्णाजी भास्कर वकिलास मारले की नाही ?
कृष्णाजी भास्करचा एकंदरच प्रसंग हा ९१ कलमी बखारीवर आधारित आहे. आता ९१ कलमी बखरीच्या अनेक प्रती आहेत आणि प्रत्येक प्रत वेगळी माहिती देते. भारतवर्ष, राजवाडे आणि फोरेस्ट प्रतीप्रमाणे कृष्णाजीने शिवाजीराजांवर वार केला पण शिवाजीराजांनी त्यास सोडून दिले व तो निघून गेला अशी माहिती आहे तर साने प्रतीत तो जीवा महालाकरवी बर्चीने मारला गेला अशी नोंद आहे परंतु शिवचरित्र साहित्य खंडात उपलब्ध वाई परगण्याच्या हवालदार यादीच्या आधारे शिवाजी राजांनी कृष्णाजी भास्कर वकिलास मारले अशी एक नोंद मिळते. एकंदर पाहता शिवभारतकाराने चरीत्रनायाकास डोळ्यासमोर ठेवून बाळगलेले मौन आणि ही यादी पाहता शिवाजीराजांनी कृष्णाजी भास्करास मारले असल्याचे संभवते.
महाराजांनी खानास कसे मारले हाही प्रश्न येतो ?
ह्यामधे वाघनख, बिचवा आणि तलवार ह्या तिन बाबी येतात.समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे पाहिले असता काय काय माहिती मिळते ते आपण पाहुयात –
१) कविंद्र परमानंदकृत शिवभारतामधील अध्याय २१ मधील ३९ आणि ४० या दोन श्लोका नुसार
तं निर्यातयितुं वैर प्रवृत्तोसौ महाव्रतः|
शिवः कृपाणीकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत || ३९||
याचा अर्थ असा …धै
अप्रतिम लेखन, विस्तीर्ण माहीती बद्दल धन्यावाद...!
ReplyDelete