★अफजलखानाचा वध (वर्णन)★
१० नोव्हेंबर इ.स. १६५९
छत्रपती शिवरायांनी
अफजलखानाला ठार केले हा दिवस "शिवप्रताप दिवस" म्हणून साजरा केला जातो.
राजांना जाग आली. महालात मंद प्रकाश होता. महालाच्या कोपऱ्यात समईच्या दोन ज्योती थरथरत होत्या.पहाटेचा गारवा महालात होता. राजांनी पांघरूण दूर केले. पलंगावर बसून त्यांनी नित्यस्मरण केले; हात जोडले; आणि ते पलंगाखाली उतरले. सज्जापाशी जाऊन त्यांनी दृष्टी टाकली. गडावर काळोख होता. पूर्वेला उजाडल्याची जाग अद्याप नव्हती. राजांनी आवाज देताच हुजरे धावले.
मुखमार्जन, स्नान आटोपून राजे महालात आले. नित्यपूजेच्या स्फटिकशिवलिंगाची त्यांनी पूजा केली; आणि राजे सदरेत आले. आपल्या बरोबरच दहा रक्षक निवडून बाकीच्यांना त्यांनी वेगवेगळ्या कामगिर्या सांगितल्या, गाफील न राहण्याबद्दल आज्ञा दिली. सारे भरल्या मनाने राजांचे रुप न्याहाळून, मुजरा करुन पहाटेच्या अंधारात गड उतरले.
गडाच्या सर्व चौक्या-पहार्यांची त्यांनी जातीने पाहणी केली. गडाचा बंदोबस्त पाहून राजे वाड्यात आले. सदरेवर राजांच्या बरोबर जाणारी मंडळी हजर होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज होते. आपापल्या परी आपल्या जोखमीची बजावणी प्रत्येकजण करीत होता. राजे सदरेवर आले. राजे म्हणाले,
'आम्ही यशस्वी होऊ, यात शंका नाही. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही, तर... आम्ही गेलो,म्हणून धीर सोडू नका. सगळ्यांना सांगितलं, तेच तुम्हीही ध्यानी ठेवा. आज ह्या घडीला प्रतापगडापासून सुप्यापर्यंत आमची फौज जंगलराईतून दबा धरुन बसली आहे. खानासकट पुर्या फौजेचा निकाल लावा. खानाचा बीमोड करुन राजगड गाठा. सार्यांचे डोळे त्या बोलांनी भरुन आले.
मध्यान्हीचा समय जवळ येत होता. राजांनी पंताजी गोपिनाथांना खानाला आणण्यासाठी रवाना केले. पंत जात असता राजांनी सांगितले,
'पंताजी, खान तहाच्या अटी पाळतो, हे पाहा. आम्ही भेटल्याखेरीज खानाला नजरेआड करु नका.'
'राजे, आपण काळजी करु नये. खानाला एकटा आणून सामोरे उभा करतो.'
तुतार्यांचा आवाज झाला. चौघडा झडला. खान भेटीच्या जागी यायला निघाला होता.
कृष्णाजी भास्कराला स्वार माचीखालील ठेवण्याची आज्ञा खानाने केली. खानाची पालखी माचीची टेकडी चढू लागली. खान माचीवर आला. शामियान्यासमोर पालखी ठेवली गेली.
भर उन्हाच्या किरणांत राजे केदारेश्वराजवळ जाऊन पोहचले. केदारेश्वराला वंदन करुन राजे बुरुजावरुन पाहत होते.
राजे गडावर तयारच होते. राजांनी माणकोजींच्याकडे पाहिले. माणकोजी खचले होते. राजांना त्यांनी सहा वर्षांचे असताना पाहिले होते. पोरासारखे राजांवर प्रेम केले होते. राजांची दृष्टी भिडताच म्हतार्याची मान कापू लागली. डोळे भरुन आले. राजांनी माणकोजींचे पाय शिवले.
' शिवबा !' म्हणत माणकोजींनी राजांना उठविले; आणि मिठी मारली. माणकोजी म्हणाले,
' राजा ! सोनं लुटून ये !'
राजांनी माणकोजींना सावरले. ते म्हणाले,
' भवानी आम्हांस राखील. आमची चिंता करु नका. काही झालं, तरी राज्य विसरू नका.'
' पंत आत खानाच्या शेजारी कोण आहे ?'
' बंडा सय्यद आहे.'
' त्याला ठरल्याप्रमाणे बाहेर जायला सांगा.' खानही अस्वस्थ झाला होता.
खानाचे रुप राजांनी क्षणात हेरले. मोगलाई पगडीवर पाचूंच्या जडावाचे हिरवे गर्द पिंपळपान चमकत होते. चेहऱ्यावर हास्य होते. डोळे राजांच्या वर रोखले होते. धुराचा लोट उठावा तसा खान चौथर्यावर उभा राहिला.
राजांचा बांधा अमळ ठेंगणा व सडपातळ. खानाच्या तुलनेने ते फारच किरकोळ भासत होते. पंताजी गोपिनाथांनी ओळख करुन दिली.
' वीजारमताब हुजूर अफझल खान माहमदशाही ! '
कृष्णाजी भास्करांनी सांगितले,
' महाराज शिवाजीराजे भोसले.'
खानाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो राजांच्याकडे बोट दाखवून विचारता झाला,
' शिवाजी शिवाजी म्हणतात, तो हाच काय ?'
दोन्ही वकिलांनी माना हलविल्या.
राजांनी निर्भयपणे खानाकडे पाहिले, आणि राजांचा कणखर आवाज उमटला,
' खान खान म्हणतात, तो हाच काय ?'
दोन्ही वकिलांनी आश्चर्यचकित होऊन कळायच्या आत होकारार्थी मान डोलविल्या, आणि अदबीने ते मागे सरले.
शामियान्याच्या खास चौकात फक्त दोघे उरले. खानाने आपले विशाल बाहू पसरले; आणि तो म्हणाला,
' आवो, राजे !'
राजे धीम्या पावलांनी चौथरा चढून गेले. त्यांनी जगदंबेचे स्मरण केले; आणि अफझलचे हात राजांच्या पाठीवर पडले. शिवाजीराजांनी खानाच्या उजव्या छातीवर मस्तक टेकले. खानाचे बळ वाढत होते. खान हसला; आणि त्याने राजांचे मस्तक डाव्या बाजूला घेतले. खान राजांचे मस्तक काखेकडे नेऊ पाहत होता. खानाच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू उमटले होते. तोच ते हास्य विरले. डोळे विस्फारले गेले. तीव्र वेदना मुखावर प्रकटली. खानाच्या वेदनेसह त्याचा संताप उसळला. त्याने जमदाड उपसली, आणि राजांच्या पाठीत खुपसली. पण ती जरी कुडत्यावरुन अंगरखा फाडीत सरकली. राजांनी त्याच क्षणी बिचवा उपसून खानाच्या मागे बाजूत भोकसला. सर्व ताकदीने बिचवा आडवा ओढला. खान त्या वाराने मागे कलला. खानाच्या पकडीतून सुटका करुन घेत राजांनी चौथर्याखाली उडी मारली. तोच संतापाने बेभान झालेल्या खानाचा दुसरा वार राजांच्या मस्तकावर झाला. जिरेटोप तुटून, आतले जरी बख्तर फुटून त्या वाराने राजांच्या टाळूवर निसटती जखम झाली. सुन्न झालेले राजे स्वतः ला सावरीत असतानाच खान ओरडला,
' दगा ? ? ? दगा ? ? ? '
' दगा ? ? ? दगा ? ? ? '
शामियान्यात सर्व लक्ष केंद्रित करुन दाराशी उभे असलेले संभाजी कावजी व जिवा आत घुसले. क्षणाचाही अवधी न घेता जिवा महालाने बैठक घेतली. राजांच्या पासून अगदी नजीक पट्टा आला असता तो हात आपल्या तलवारीने कलम केला. सय्यदचा हात पट्टासह तुटला.
संभाजी खानाकडे बघत होता. रक्तबंबाळ झालेला खान दुशेल्याने पोट बांधून दिसेल त्याचा आधार घेत, रक्त सांडीत शामियान्याच्या बाहेर जात होता. झोकांड्या देत त्याने पालखी गाठली. भोयांनी ती उचलीपर्यंत संभाजी धावला. कसलाही विचार न करता त्याने भोयांचे पाय तोडले. पालखी पडली, आणि संभाजीची तलवार खानाच्या छातीत घुसली.
No comments:
Post a Comment