शिवछत्रपती व दुर्गबांधणी : भाग : ३
' गडपती ' असे सार्थ नांव समर्थांनी शिवछत्रपतींना दिले आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचे अवलोकन केल्यास या नावातील मर्म ध्यानी येते. महाराजांचे दुर्ग विषयक व भौगोलिक ज्ञान किती सूक्ष्म होते, याचा प्रत्यय गडाचा अभ्यास करतानाच नव्हे तर केवळ त्यांचे जीवनातील घडामोडी पाहिल्या तरी लक्षात येईल. प्रतापगडाची उभारणी व त्याची अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी त्यांनी निवड केलेला प्रतापगड, हे युध्दक्षेत्र हे याचे उत्तम उदाहरण देता येईल. शिवरायांनी जागोजागी किल्ले बांधले या मागील कारण चिटणीसाने सुंदररित्या सांगितले आहे. " जागाजागा कोकणात व मावळात देशात डोंगर चांगला आढळेल तेथे व समुद्र किनारा किल्ले बांधावे, ऐसे करीते जाल. यासी कारण एक, देशास प्रंतास जाग्याचा ( सुरक्षित स्थळ ) आधार होतो, जागा असेल तेथे सुभा जमयतीने ठेवणे घडते. त्या दहशतीने दुसरा शत्रू आपले देशात उपद्रव लावीत नाही व देशक ( देशमुख, देशपांडे, इत्यादी देशाधिकारी ) आदीकरून पुंडपणे बळावत नाहीत सर्वावर सलाबत असावी हे मनात आणुन किल्ले बांधिले."
" शत्रू चालून आला तो लागलाच डोंगारावरी चढून तटास लागत नाही. शत्रू चालून येतो हे पाहून आपले लोक सावध होतील, दगडच लोटतील तरी त्यांचे दबावाने गनिम दबेल इतकियांत आपलाहि उपराळा ( मदत ) होईल. दुसरी ठाणी, किल्ले, कोट सुभे जवळ असतील ते मदत करतील त्याणे किल्लीयास अपाय होणार नाही. ऐसी कळता करून किल्ले केले."
गोव्याच्या दक्षिण हद्दीवर साळ नदीच्या मुखावर महाराजांनी किल्ला बांधायला सुरवात करताच, पोर्तुगीजांची तारांबळ उडाली कारण त्यांच्या मते किल्ला जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला धोका आहे, असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. किल्ला बांधून झाला तर आमच्या जहाजाना आजच्या प्रमाणे मुक्तपणे संचार करता येणार नाही, त्यांनी महाराजांचे बाकुलीच्या हवालदारास किल्ला न बांधण्यासंबंधी पत्र पाठवले त्यावर हवालादाराने उत्तर धाडले की, " किल्ला मी शिवाजी राजे यांच्या आज्ञे वरुन बांधीत आहे. परंतु या किल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यांत आम्ही काहीही करण्यास मुखत्यार आहोत. त्याचा जाब विचारणार तुम्ही कोण?"
No comments:
Post a Comment