Total Pageviews

Monday, 16 November 2015

शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : ४

शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : ४

दुर्गामुळे त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचे संरक्षण होई. पण फोंडा उर्फ मर्दनगडामुळे पोर्तुगीजांच्या गोवा बेटावर नेहमी टांगती तलवार असायची. मर्दनगडामुळे शत्रू आपल्या प्रदेशाजवळ ठाण मांडून बसला आहे. असे मानून पोर्तुगीजांनी नवीनच शक्कल लढवली. त्यांनी मर्दनगड ताब्यात घेऊन नष्टच करुन टाकले. व्हाईसराय कोंदिद योग म्हणतो की, " मर्दनगड नष्ट झाल्यामुळे मराठ्यास किंवा एखादा कोकणातील राजास तो किल्ला घेण्याचे आता कारण उरले नाही." संभाजी महाराजांनी फोंडा किल्ला पाडून उभारलेला मर्दनगड पोर्तुगीजांनी १ जून १७६३ रोजी मराठ्यांकडून जिंकून घेतल्यावर व्हाईसरायच्या आज्ञेने मर्दनगड पाडून टाकण्यास सुरवात करुन सत्तावीस दिवसात हे काम पूर्ण करण्यात आले.
शिवाजी महाराजांचा जन्म, वास्तव्य व मृत्यू हे दुर्गावरच झाले. अवघ्या सोळा-सतराव्या वर्षा पासून त्यांनी जुने गड ताब्यात घेणे, त्यांची दुरुस्ती, पुनर्रचना करणे, नवीन दुर्गांची उभारणी करणे आरंभिले होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी मुरुंबदेवाचा डोंगर ताब्यात घेऊन त्यावर दुहेरी तटबंदी व चिलखती बुरुजांच्या सहाय्याने राजगड लढाऊ दृष्ट्या इतका भक्कम केला की स्वराज्याच्या सुरुवातीच्या अस्थिरतेच्या काळात सुध्दा महाराज या गडावर २४ वर्ष राहिले. यावेळी राजगड राजधानीचे ठिकाण होते. त्यांच्या हयातील एकाही शत्रूने राजगड जिंकण्याची कल्पना देखील केली नाही. स्वित्झर्लंड देशातील ल्युसर्न या गावी जगातील वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडले गेले. त्यामध्ये राजगडाचे स्थान होते, असे म्हणतात.
रायगडचा किल्ला ताब्यात घेऊन, त्याला महाराजांनी असा बुलंद बेलाग बनविला की हा गड पाहून इंग्रज वकील टॉमस् निकल्सनने लिहून ठेवले की, " हा किल्ला इतका दुर्भेद्य बनविला आहे की, अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुध्द लढू शकेल." महाराजांच्या समकालीन पाश्चात्त्यांनी लिहिले आहे, " सेनापतीचे कार्य व सैनिकांचे कार्य या विषयांचा शिवाजीने अतिशय सूक्ष्म अभ्यास केलेला असून दुर्गांची पुर्नरचना करण्याची कला उत्कृष्ट स्थापत्य विषारदांपेक्षाही त्यांना अधिक अवगत होती."

No comments:

Post a Comment