शिवछत्रपती व दुर्गबांधणी भाग : ५
राजगड, रायगड, पद्यदुर्ग,खांदेरी इतर किल्ले पाहिले म्हणजे महाराजांचे बांधकाम विषयीचे सूक्ष्म ज्ञान ध्यानी येते. या तंत्रात ते निष्णात समजले जात. दुर्ग बांधणे, त्याची देखभाल करणे यासाठी लागणारे अधिकारी, तंत्रज्ञ, बेलदार इत्यादी लोकांची कायमस्वरुपी नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, ही माहिती यादव दप्तरातून मिळते. आपल्या अर्जीमध्ये सुरराव यादव म्हणतात," थोरले महाराज ( शिवाजी महाराज ) पुंडावे करीत असेत समई ( त्यांच्या ) जवळ आमचे बाबा गिरजोजी बाबानी सेवा केली. चुलते आर्जाजी यादव व हिरोजी फर्जंन हे दोघे इमारतीचे हवालदार यांजजवळ अठरा हजार माणूस इमारतीचे. येकाचे नऊ हजार व येकाचे नऊ हजार. येकून अठरा हजार. जितका महाराजांनी किला बांधला त्या किल्ल्यास हिरोजी फर्जंन याचा हवाला व अर्जाजी ( यादव ) बावाजी सरनोबती वतनीबात याप्रमाणे महाराजानी करुन दिले."
दुर्गबांधणी व त्याची निगा राखण्यासाठी महाराजांनी अठरा हजार लोक नियुक्त केले होते. या मध्ये पाश्चात्त्य लोकही होते. गोवे आणि वेंगुर्ल्या कडील परकीय लोक त्यांनी निरनिराळ्या गडांवरील कामावर नियुक्त केले होते. असे महाराजांनी लाँगहॉर्न याला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सिंधुदुर्ग उभारणीसाठी ५०० पाथरवट, ३०० लोहार व तीन हजार मजूर तीन वर्ष एकसारखे खपत होते.
कुशल व निष्णात शिल्पज्ञ ओळखणे व त्यांना कामावर योजावयास महाराजांना अडचण जाणवत नव्हती. सप्टेंबर १६७७ मध्ये महाराजांनी वुइल्यम लाँगहॉर्न याला लिहिले की, " कर्नाटक प्रांतात आल्यापासून आम्ही अनेक दुर्ग जिंकले आहेत. कित्येक दुर्गांत आम्हास नवीन बांधकामे करावयाची आहेत. तोफा नेण्याकरितां लागणारे मोठे गाडे करण्याचे काम करु शकणारे, त्याच प्रमाणे सुरुंग लावून मोठ्या दगडी भिंती पाडण्याची माहिती असणारे लोक तुमच्या आश्रयास असतील. प्रस्तुत अशा माणसांची आम्हांस अत्यंत आवश्यकता आहे. विशेष करुन सुरुंग लावून दगडी भिंती पाडण्याचे ज्ञान असलेले लोक आम्हांस पाहिजे. हे ज्ञान असलेले गोवे वेंगुर्ल्या कडील लोक आमच्या पाशी होते. परंतु त्यांना आम्ही आमच्या निरनिराळ्या गडांवरील कामावर नियुक्त केले आहे. या लोकांजवळ अशा आणखी माणसांविषयी शोध केला असता. त्यांच्या कडून आम्हांस असे समजले की ते सर्व लोक पट्टण व पालिकाटकडे गेले आहेत."
" याकरिता ज्या लोकांस सुरुंग लावण्याची उत्तम माहिती आहे, असे लोक आम्हांस मिळू शकतील की नाही, या संबंधी शोध करुन असे लोक मिळत असल्यास वीसपंचवीस निदान दहा-पाच लोक तरी आम्हांला मिळवून द्यावेत. आम्ही त्यांना आमच्या अधिन असलेल्या निरनिराळ्या दुर्गांत उत्तम वेतन देऊन चाकरीवर ठेऊ. तुम्ही येवढी कृपा केल्यास तुमचे आभारी होऊ. तरी तुम्हांस जितकी अशा प्रकारची लोकं मिळतील तितकी मिळवून आमच्याकडे पाठवून देणे."
वरील पत्रावरुन आपले दुर्ग भक्कम करण्याकडे महाराजांचे किती बारीक लक्ष असे हे दिसून येते, पण पाश्चात्त्य शिल्पज्ञ मिळाले नाहीत म्हणून त्यांचे काम खोळंबलेले दिसून येत नाही.
No comments:
Post a Comment