कारतलबखानाची कोंडी
भाग : 2
उंबरखिंडीच्या पाऊल वाटेवर कारतलबखान येताच मराठयांच्या रणभेरी निनादू लागल्या आपल्याला शत्रूने चहू बाजूने घेरले आहे हे कारतलबखानाच्या लक्षात आले लगेच कारतलबखान, मित्रसेन, अमरसिंह, हे युद्धास सज्ज झाले. मराठयांनी चारही बाजूनी आक्रमण सुरु केले बाणांचा तर वर्षावच सुरु झाला, या सगळ्यात मित्रसेन आणि अमरसिंह यांनी पराक्रमची चांगलीच शर्त केली, पळणाऱ्या यवनांना पळू नका स्थिर रहा असा मित्रसेन धीर देत होता (शिभा-अ-२८/८१-८७), चहू बाजूने आक्रमण होऊनहि कारतलबखान युद्धावेश सोडत नाही हे पाहून महाराजांनी सरनोबत नेतोजी पालकरास हुकुम सोडला ‘खानाचे सर्व मार्ग अडवा’, आता युद्ध चांगलेच पेटले खासे महाराज हातात धनुष्यबाण घेऊन शत्रूशी लढू लागले, शत्रू सैन्याची तर पुरती दाणादाण उडाली (शिभा-अ-२८/८९-९२). कारतलबखानाच्या सैन्याने आता युद्ध करणे थांबवले, सर्व सैन्याचा धीरच खचला हे पाहून रायबागीण कारतलबखानास म्हणाली सिंहरुपी शिवाजीच्या प्रदेशामधे तू प्रवेश केलास हे तू खूप वाईट काम केलेस, त्यामुळे आता तू शिवाजी महाराजांशी शरणागतीचे बोलणे कर आणि सर्वाना या मृत्यूपाशातून सोडव (शिभा-अ-२९/३-४). कारतलबखानास ते पटले व त्याने आपला दूत महाराजांकडे पाठवला (शिभा-अ-२९/१२-१४). दूत आल्याची वर्दी महाराजांना भालदारांनी दिली, त्या दूताने मस्तक लवून दुरूनच महाराजांचे दर्शन घेतले. महाराज अश्वारूढ होते, अंगात अभेद्य कवच, मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्राण, सोनेरी कमरपट्टा, रत्नजडीत अलंकार, अश्वाच्या दोन्ही बाजूस बाणांचे भाते, धनुष्य, तलवार, उजव्या हातामधे उंच भाला धारण केलेला होता (शिभा-अ-२९/१५-२५). दूत महाराजांना म्हणाला ‘शाईस्तेखानाच्या आज्ञेमुळे हा आपला प्रदेश पाहण्याची वेळ आली, आम्हाला पिण्यास पाणी नाही, अभयदान द्यावे, जीवदान द्यावे दूताचे बोलणे ऐकून घेतल्यावर महाराजांनी शत्रूस अभय दिले, कारतलबखानाने लगेच खंडणी महाराजांकडे पाठवून दिली, या लढाईमधे मराठयांना सोन्याची भांडी, झार्या, पेले, हत्ती, घोडे, हंडे अशी अगणित संपत्ती मिळाली (शिभा-अ-२९/५३-५९).
या लढाईची हकीकत आणि सविस्तर माहिती देणारे एकमेव साधन म्हणजे शिवभारत याकडेच पाहावे लागते, पण यात लढाई कधी झाली याची नोंद नाही. ही नोंद आपल्याला जेधे शकावली, शिवापूर दप्तर यादी, शिवापूर देशपांडे वहीतील शकावलीत मिळते, या नोंदी देखील गोंधळात पाडणाऱ्या आहेत, काय आहेत या नोंदी आपण पाहूयात.
१) जेधे शकावली – शके १५८२ शर्वरी नाम संवत्सर माघ शुद्ध चतुर्दसी मंगळवारी काहारतलबखान यासी लढाई जाली उंबरखिंडीस जूझ झाले त्यापासून खंडणी घेऊन वाट दिली.
२) शिवापूर दप्तर यादी – माघ शु||४ कोकणात उमरखंडीस भांडण झाले.
३) शिवापूर देशपांडे वहीतील शकावली – पौषमासी काहरतलफखानासी व सिवाजी राजे यासी लढाई झाली उंदरखिंडीत जुंज झाले राज्याची फते झाली त्याजपासून खंडणी घेतली.
या सर्व प्रकरणाकडे चिकित्सक दृष्ट्या पहिले असता यामधे शिवाजी महाराजांची मुत्सदेगिरी, त्यांचे प्रबळ हेरखाते, त्यांचे नेतृत्व-कौशल्य याची प्रचीती येते.
No comments:
Post a Comment