कारतलबखानाची कोंडी
भाग : १
स्वराज्य दुहेरी विळख्यात सापडले असताना शिवाजी महाराजांनी अकस्मातपणे पन्हाळगडा वरून पलायन केले यामुळे दख्खनच्या राजकारणाने नवेच वळण घेतले. एका संकटातून सुटून शाईस्तेखानासारख्या शत्रूस स्वराज्यातून हुसकावून लावणे या सर्व गोष्टींचा खल करत असताना देखील शाईस्तेखानाचा विश्वासू सरदार कारतलबखान याचा महाराजांनी केलेला दारूण पराभव, यामधे महाराजांनी दाखवलेली मुत्सदेगिरी,पराक्रम हे सर्व युद्धाशास्त्राचा एक अनुपम नमुना आहे त्याचाच हा परामर्श…
पन्हाळगडावरून पलायन करून महाराज राजगडास आले. महाराज जोहरच्या विळख्यातून निसटले हे शाईस्तेखानास कळताच तो पुरता काळजीत पडला (शिभा-अ-२७/५२), या सर्व घडामोडीमधे शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकून घेतला होता. दुहेरी आक्रमणामुळे स्वराज्याची परिस्थिती फार जिकिरीची झाली होती. शाईस्तेखानासारख्या शत्रूस तोंड देण्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा ह्या दोन्ही बाबींची नितांत गरज होती. मनुष्यबळ एक वेळ होते पण पैसा ? याचा उपाय म्हणून महाराजांनी मुलुखगिरीवर जावे आणि पैसा जमवावा असे सर्वांकडूनच सुचवण्यात आले. चाकण जिंकून गर्विष्ठ झालेला शाईस्तेखान आता सह्याद्रीवरून कोकणात मोहीम काढेल असा अंदाज सर्वांनीच काढला (शिभा-अ-२८/४५-४८) आणि तोच खरा ठरला. शाईस्तेखानाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे काम महाराजांचे हेर खाते अचूक करत होते. शाईस्तेखानाच्या हालचाली नंतरच आपण आपले पुढचे पाऊल टाकायचे असे महाराजांनी ठरवले आणि सर्वांच्या अंदाजाप्रमाणे शाईस्तेखानाने मोर्चा कोकणाकडे वळवलाच.
त्याने आपला विश्वासू सरदार कारतलबखान यास नामजाद केले (शिभा-अ-२८/५२). कारतलबखान यास एकांतात बोलावून शाईस्तेखान त्यास म्हणाला ‘ तो सह्याद्रीचा अधिपती शिवाजी युद्धामध्ये कसे दुष्कर कर्म करतो हे तुला माहिती आहे सह्याद्री पादाक्रांत केल्याशिवाय तो सह्याद्रीपती आमच्या ताब्यात येणार नाही म्हणून माझ्या आज्ञेने तू सेनेसह लगेच सह्याद्री उतरण्याचा विचार कर, मला मोठे यश मिळवून दे, चौल, कल्याण, नागोठणे, भिवंडी, पनवेल हे तू हस्तगत कर ‘ (शिभा-अ-२८/५५-५९). कारतलबखानासोबत कछपसिंह, चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, रायबागीण, जसवंत कोकाटे, जाधव यांची नेमणूक केली. कारतलबखानाने कोकणात उतरण्याचा मार्ग निवडला तो लोहगडाच्या दक्षिणोत्तर दिशेने असलेल्या तुंगारण्यातून होता. हा मार्ग निवडायचे प्रयोजन काय ? हे मात्र पुराव्याअभावी सांगता येत नाही, पण हा मार्ग अतिशय बिकट आणि अरुंद होता या मार्गाने जात असताना एखाद्या नलिकायंत्रासारख्या पाऊल वाटेने पुढे सरकताना सर्व सैन्य कुंठीत झाले होते. हेरांनी अगोदरच महाराजांना कारतलबखानाची खडान-खडा माहिती दिली होती व त्यामुळे महाराजांनी अगोदरच आपले सैन्य त्या अरण्यातील झाडीत दडवून ठेवले होते (शिभा-अ-२८/७८). खासे महाराज तिथे येऊन कारतलबखानाची वाट बघत होते, कारतलबखानास कुठल्याही प्रकारचा विरोध महाराजांनी केला नाही. त्याला त्या निर्बिड अरण्यात कोंडीत पकडून अरण्यसागरातच नामशेष करावयाचे महाराजांनी ठरवले होते. घाटमाथ्यावरून उतरणीच्या मार्गाने उंबरखिंडीच्या रोखाने कारतलबखान कोकणात उतरणार होता. उतरणीच्या मार्गाने उतरताच ते घनदाट अरण्य पाहून आपण कुठलातरी अंधकार प्रदेश पहिला असे त्या सैन्यास वाटले, जिथे वारा नाही, प्रकाश नाही फक्त किर्र झाडी होती (शिभा-अ-२८/७०-७४).
No comments:
Post a Comment