गनिमी कावा - युद्धतंत्र !
गनिमी कावा ही मराठ्यांची परंपरागत युद्धपद्धती मानली जाते. शत्रूचे सामर्थ्य आपल्यापेक्षा जास्त असेल आणि म्हणून त्याला समोरासमोर टक्कर देणे परवडण्यासारखे नसेल, तर मराठे या तंत्राचा उपयोग करीत. राजाराम महाराजांच्या काळात त्याचा उपयोग मराठ्यांनी कसा केला, याचे वर्णन चिटणिसांच्या बखरीत फार चांगले उतरले आहे. ""मोगली फौज मोठी, एके ठिकाणी उभी राहून लढाई करणार, मराठे यांनी आज ये ठायी, तर उद्या वीस-पंचवीस कोसांवर जावे; पुन्हा एकाएकी येऊन छापा घालावा, काही लढाई देऊन लुटून पळावे, काही रसद मारावी, पातशहाची ठाणी असतील ती उठवावी. खुद्द पातशहाचा मुक्काम असेल तेथे छापा घालावा, मुलूख मारावा, हत्ती, घोडे, उंट पळवावे, अशी धांदल करीत चालावे. गंगातीर प्रांती भागानगरपर्यंत खंडण्या घ्याव्या, एखादे ठाणे बळकावून झाडीचे आश्रयाने छावणीस राहावे. चंदीकडे मोगल फौजा रवाना होतील, त्यांस अडवावे, लढाई करावी, प्रसंग पडल्यास लुटावे. झुल्फिकारखानाकडून पातशहाकडे अर्जी येत असावी, की मराठी फौजांपुढे आमचा उपाय राहिला. हे पातशहांनी ऐकून त्यांचा विचार पडला, की यांशी कसे लढावे! सारांश मराठ्यांनी प्राण तृणप्राय समजून राज्याविशी झटावे, कामे काते केल्यानंतर सरदारांनी त्यांची नवाजीस करावी, बक्षीस द्यावे, किताबत सरंजामाच्या सनदा आणून घ्याव्या. पातशहासारखा शत्रू, लाखो फौजा, खजिना बेमुबलग, छकड्यास छकडे द्रव्याचे भरोन कोटिशः चालले आहेत. आपले सैन्य थोडे, जमा होऊ न देता मसलकीने हिंडोन फिरोन त्यांनी लांडगेतोड करावी. आपल्या फौजेत मणी धारण, त्यांच्या लष्करात शेराची, अशा रीतीने त्यांस चैन पडो देऊ नये.''

No comments:
Post a Comment