Total Pageviews

Monday, 7 September 2015

शिवछत्रपती व दुर्ग ; भाग 02

शिवछत्रपती व दुर्ग ; भाग 02
स्वतः शिवाजी महाराज सन 1663 मध्ये मोगल अधिकाऱ्याला पाठविलेल्या पत्रात म्हणतात की, "आज तीन वर्ष बादशहाचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करणेसाठी चालून येत आहेत. हे तुम्हास सर्वांस माहित आहे. बादशहा हुकुम फर्मावितात, 'शिवाजीचे किल्ले व मुलूख काबीज करा' तुम्ही जबाब पाठविला 'आम्ही लवकरच काबीज करतो!' (पण) आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचविणे सुद्धा कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची भाषा कशाला! भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठविणेस तुम्हास लाज कशी वाटत नाही? कल्याण व बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते. ते तुम्ही काबीज केले आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे. नदी नाले उतरुन जाणेस वाट नाही, अत्यंत मजबूत असे साठ किल्ले आज माझे तयार आहेत, पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत."
"बिचारा अफजलखान जावळीवर फौज घेवून आला आणि नाहक मृत्यू मुखी पडला हा सर्व प्रकार आपल्या बादशहास का कळवित नाही? अमिर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबी डोंगराळ व पाताळास पोहचणार्या खोर्यात सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून त्याचा प्रदेश काबीज करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वार्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे, आपल्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठविल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."
शिवाजी महाराजांच्या वरील पत्रावरून त्यांना त्यांच्या दुर्गम प्रदेश व दुर्गावार किती विश्वास होता हे ध्यानी येते. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी केवढं धाडस केले होते. ज्याच्या पदरी लाखोंच्या संख्येने सैन्यबळ होते, प्रचंड संपत्ती होती, स्वतःच्या वडिलांसहित बारा मावळचे देशमुख,देशपांडे ज्यांचे नोकर चाकरा होते, अशा आदिलशाही विरूद्ध बंड पुकारून स्वराज्याचे तोरण उभारले. मोगल, सिद्दी, पोर्तुगीजांशी लढतच त्यांनी आपले राज्य उभारले.
सभासद म्हणतो , " ज्या मुलूखात आदिलशाही निजामशाही गड होते तितके घेतले, कित्येक डोंगर बांके जागेत होते ते गड वसविले. गडांकरीता मुलूख जप्त होतो असे समजून गड बांधीले."
शिवाजी महाराजांचा गडाचा उल्लेख करताना मुल्ला नुस्रत म्हणता, "जिथे वार्याची देखील प्रवेश करण्याची मजल नव्हती, तिथ पर्यंत शिवाजीच्या घोड्यांची दौड होती. जणू काही आकाशाचे बच्चे असे जे गगनचुंबी गड होते, ते त्याने शेकडो युक्त्या प्रयुक्त्या करून, हल्ले चढवून घेवून टाकले."
क्रमशः
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment