Total Pageviews

Tuesday, 8 September 2015

धान्यकोठार भाग:१

धान्यकोठार भाग:१
"धान्य आणि दुर्ग शाबित असता शत्रू भंगे
सेना देश अवघे सहजचि मिळती."
"लिढाईचा दंगा पुरवतो परंतु उपासाचा नाही." - बापूजी पाटणकर यांनी पेशव्यांना सन 1764 मध्ये लिहिलेले वाक्य वाचले म्हणजे धान्य कोठाराचे महत्त्व ध्यानी येते. कारण सैन्य चालते पोटावर.
"इथे ( शिवनेरी ) हजार कुटुंबाना सात वर्ष पुरेल एवढी शिधा सामुग्री आहे" डाँ. जॉन फायर यांनी सन 1673 मध्ये शिवनेरीला भेट दिल्यानंतर वरील वर्णन करुन ठेवली आहे. कितीही बलाढ्य दुर्ग कितीही शस्त्र सज्ज असला तरी, ज्या दिवशी धान्यसाठा संपेल, त्या दिवशी शरणागती स्विकारल्या शिवाय गत्यंतर राहत नसे. गडावरील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा करुन ठेवणे नितांत गरजेचे होते.24 नोव्हेंबर 1737 च्या पत्रानुसार, अशेरीगड घेण्यासाठी मराठे वेढा घालून बसले होते. पण गड मात्र शरण येण्यास तयार नव्हता. याचे कारण चिमाजी अप्पांना सांगताना पत्र लेखक लिहितो की, " किल्यावर धान्याची बेगामी ( पुरेसासाठा ) आहे. यामुळे गनीम आयास ( शरण ) येत नाही".
शत्रूचा गडाला कधी वेढा पडेल याचा नेम नसे, अशा वेळी बाहेरुन मदत येण्याची शक्यता फार धूसर असे. त्यामुळे वेढा सहा महिने जरी पडला तरी गडावरील सर्व लोकांना अन्न धान्यांची कमतरता भासणार नाही इतका साठा तर करुन ठेवावा लागेच. गडावरील साठा संदर्भात पोर्तुगीजांच्या पत्रामधील एक उल्लेख असा. " दिवच्या किल्ल्याचे भात ( तांदूळ ) गोव्याकडे पाठविणेत आला आहे. त्यांना पुन्हा पुढच्या वर्षाची तरतूद केली पाहिजे " म्हणजे पुढच्या वर्षाची तरतूद आधीच करुन ठेवीत, कारण प्रत्येक वर्षी पीक येऊन धान्य मिळणारच याची शाश्वती नसे. लढाई, दंगेधोपे, दुष्काळ यामुळे ही काळजी घ्यावी लागे.
औरंगजेब 8 आक्टो 1681 रोजीच्या उदगिरचा किल्लेदार अन्वरखान याला पाठवलेल्या फर्मानात लिहितो की, वर्षभर पुरेल इतका रसदेचा साठा किल्यात करण्यात आला पाहिजे, जुने धान्य काढून टाकण्यात यावे. जुने धान्य खराब होऊ नये म्हणून ते काढून ( त्याची विक्री करीत ) नविन धान्य भरण्यात येई.
धान्य कोठारामध्ये भात ( तांदूळ ) नाचणी, ज्वारी डाळी, तंबाखू तेल मीठ इत्यादी आवश्यक गोष्टींचा साठा करीत. अंबरखान्यात धान्य भरुन ठेवण्यासाठी गडाच्या घेर्यातील गावामधील शेतकऱ्यांकडून धान्य गोळा करण्यात येई. प्रत्येक गडाच्या घेर्यातील, हद्दितील गावांची संख्या निरनिराळी असे.
क्रमश;
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment