Total Pageviews

Tuesday, 8 September 2015

शिवाजीमहाराजांचे दुर्गबांधणीतले अभिनव प्रयोग

शिवाजीमहाराजांचे दुर्गबांधणीतले अभिनव प्रयोग

१. डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेशद्वाराशी येणारी मुख्य वाट.
मध्ययुगात तोफा बंदुका असल्या तरी त्यांचा पल्ला कमी होता. त्यामुळे मुख्य लढाई डाव्या हाताला ढाल लटकावून अन् उजव्या हातातील तलवारीचे घाव घालून खेळली जाई. किल्ल्याकडे येताना तो डोंगर व ती तटबंदी उजवीकडे असेल तर वरून येणारे गोफण-गुंडे , दगड, भाले, बाण व बंदुकीच्या गोळया इत्यादी उजव्या हातातील तलवारीने अडवणे अशक्य होई व किल्ल्यावरच्या मराठयांना डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेश द्वाराकडे येणाऱ्या वाटेचा फायदा होई.
२. गोमुखी प्रवेशद्वारे -
शिवनिर्मित किल्ल्यांचे वैशिष्टय म्हणजे किल्ल्याच्या महाद्वाराची गोमुखी बांधणी, प्रवेशद्वार दोन बुरुजांमध्ये लपवलेलं असल्याने शत्रूला सहजासहजी न दिसणे, प्रत्यक्ष प्रवेशद्वाराजवळ दोन बुरुजांची अरुंद खिंड व हत्तीला धडक देण्यासाठी थोडं मागे जाऊन, पळत येऊन, दारावर मुसंडी मारण्याएवढी जागा ऐन दाराशी नसणे.
३. तटबंदीची बांधणी -
मालवण शेजारचा सिंधुदुर्ग हा बलाढय किल्ला बांधताना तटाचे चिरे शिसाचा उकळता रस ओतून बसविले होते. 
थळवायशेत जवळच्या खांदेरीचा किल्ला ऐन समुद्रात मुरूडच्या जंजिऱ्यावरील सिद्दी अन् मुंबईकर लुच्च्या इंग्रजांच्या विरोधात उभारला. तटबंदी बाहेर समुद्राच्या लाटा आपटतात. त्यापासून संरक्षण आणि तटाशी कोणीही लगट करू नये म्हणून दगडांची रास तेथे ओतली. 
मुरूडच्या जंजि-याशेजारी उभारलेल्या पद्मदुर्गाची बांधणी तर अशी पक्की की तेथे बांधलेल्या तटबंदीतील दगडी चिरे गेल्या तीनशे वर्षात लाटांच्या माऱ्याने झिजून गेले. पण चिऱ्यांमधील दरजांमधील चुना अजूनही शाबूत आहे. 
शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना
'रामचंद्रपंत अमात्य' या शिवकालीन मुत्सद्याने शिवराजनीती सांगणारा 'आज्ञापत्र' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना मोजक्या शब्दात परंतु चपखलपणे व स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
'संपूर्ण राज्याचे सार ते दुग'. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय. प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देशच उध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे?....ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी.
....ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरंवशावर न रहाता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू नये....... राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले, ते देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून, पाडून गडाचे आहारी आणावा.... गडाची इमारत गरजेची करू नये. तट, बुरुज, चिलखत, पाहारे, पडकोट जेथे जेथे असावे, ते बरे मजबूत बांधावे. नाजूक जागे जे असतील ते सुरुंगादी प्रयत्ने करून अवजड करून, पक्की इमारत बांधून गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे. ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे...... किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून, एक-दोन-तीन दरवाजे तशाच चोरदिंडया करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेऊन , वरकड दरवाजे व दिंडया चिणून टाकाव्यात....गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्यात. त्या सर्व काळ चालू देऊ नयेत.... गडाची राख़ण म्हणजे कलारग्याची झाडी..... गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा... पाणी बहुत जतन राखावे... गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधो नये...तटोतटी केर कसपट किमपि पडो न द्यावे. ताकीद करून झाला केर गडाखाली टाकता, जागजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करावे.... तटास झाड वाढते ते वरचेवरी कापून काढावे. तटाचे व तटाखाली गवत जाळून गड नाहाणावा लागतो.... गडावरी झाडे जी असतील ती राखावी.
प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या सौजन्याने

No comments:

Post a Comment