Total Pageviews

Monday, 7 September 2015

शिवछत्रपती व दुर्ग ; भाग 03

शिवछत्रपती व दुर्ग ; भाग 03
अफजलखान वधानंतर महाराजांनी पन्हाळागड 28 नोव्हेंबर 1659 रोजी घेतल्यावर महाराज गडावर आले तेव्हा रात्र झाली होती. महाराजांना पन्हाळा पाहायचा होता. पन्हाळा काही लहान किल्ला नव्हें. याचा वरचा परिसर फार मोठा, पण रात्रीच्या वेळेस चंद्र ज्योती, मशालीच्या उजेडात त्यांनी संपूर्ण गड पाहिला. तेव्हा कुठे त्यांचे समाधान झाले. असा दुर्गप्रेमी राजा यापूर्वी झाला नव्हता.
दुर्ग बांधने, जतन करणे यामध्ये जसे शिवाजी महाराज कुशल होते. त्याप्रमाणेच दुर्ग जिंकून घेण्यात देखील ते माहिर होते. पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले तेवीस किल्ले त्यांनी अल्पकाळात जिंकून घेतले. मुंबईकर इंग्रज पत्रात लिहितात , " पूर्वी जयसिंगाला दिलेले तेवीस दुर्गम किल्ले त्याने (शिवाजीराजे) आपल्या पक्षाप्रमाणे चपळ स्वारांच्या सहाय्याने (त्यांना तो आपले पक्षी, पाखरे असेच म्हणतो) मोगलां पासून आठ महिन्याचे आत परत घेतले." समुद्रातील जंजीराच काय तो प्रयत्न करूनही महाराजांना घेणे जमले नाही. आणि त्यांचे जन्म स्थान होते म्हणून की काय शिवनेरी हा गिरीदुर्ग त्यांना घेता आले नाही. पण हे अपवाद गिरीदुर्ग जिंकण्यात मराठे कुशल होते. यासंबंधी सन 1738 मधील एका पत्रा मधील वाक्य असे, "फिरंगी डोंगरास गाढू आणि आमचे लोकांचे मराठे तो बिरिदच किल्ल्यास."
रामचंद्र अमात्य गडकोटांचे महत्त्व सांगताना लिहितात की, "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता मोकळा देश पराचक्र येताच निराश्रय, प्रजाभन्ग होवून देश उब्दस (उध्वस्त) होतो. देश उध्वस्त झाल्यावराही राज्य असें कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कै. स्वामीनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय, त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधीले, तसेच जलदुर्ग बांधीले. त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी, अहिवंतापासून कावेरी तीरापर्यत निष्कंटक राज्य संपादिले.
"ज्या देशात गडकोट नसतील त्या देशात आपले राज्याच्या सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळे बांधीत बांधीत तो देश आक्रामावा. त्या देशाची आश्रयी सेना ठेवून पुढील देश स्वशासने वश करावा, असे करीत करीत राज्य वाढवावे."
"गडकोटांचा आश्रय नसता फौजेच्याने पर मुलूकी टिकाव धरून राहवत नाही. फौजे विरहीत पर मुलूकी प्रवेश होणेच नाही. इतक्याचे कारण ते गडकोट विरहीत जे राज्य त्या राज्याची स्थिती म्हणजे अभ्रपटल न्याय आहे."
"याकरीता ज्यास राज्य पाहिजे त्यानी गडकोट हेच राज्य,
गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ,
गडकोट म्हणजे खजीना,
गडकोट म्हणजे सैन्याचे बल,
गडकोट म्हणजे राज लक्ष्मी,
गडकोट म्हणजे आपली वस्ती स्थळे,
गडकोट म्हणजे सुख निद्रागार,
गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षक असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानू नये."
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment