धान्यकोठार भाग 02
धान्य ज्या ठिकाणी साठवीत, त्याला धान्यकोठार किंवा अंबारखाना असे म्हणत. गडाचा आकारमान त्याचे स्थान पाहून गडावर एकहून अधिक धान्यकोठार बांधीत. पुरंदरावर एकहून अधिक धान्यकोठार असल्याचा उल्लेख 25 मे 1834 रोजीच्या पत्रामध्ये आढळतो. धान्यकोठार कसे बांधावे यासंबंधी सूचना करताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, " गडावरील धान्यगृहे, इस्तादे ( युद्धसामुग्री ) ची घरेही सकळही ( आहेत त्यास ) अग्री, उंदीर, किडा, मुंगी, वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी गच्ची बांधावी." बांधताना काळजी घेतली नाहीतर धान्य खराब होण्याचा प्रसंग येई. सन 1772 मध्ये अशेरी गडावरील धान्यकोठारा संबंधी माहिती मिळते ती अशी, " किल्ले अशेरी येथे भात उंदराचे उपद्रवे करुन फार जाया होते, तर तेथे तक्तपासी कोठी बांधावी लागते. तरी किल्ले अशेरीस कोठी बांधावयास आज्ञा"
शिवकाळात महाराष्ट्र हा रणक्षेत्र बनला होता, अशा वेळी कित्येकदा उभी पिके शत्रू उद्ध्वस्त करी. त्यामुळे अन्न धान्याची टंचाई निर्माण होई ती दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातून तांदूळ आणीत महाराजांची भात, मीठ वगैरे मालाची भरलेले गलबते बंदराकडे येत असल्याचे अनेक उल्लेख पोर्तुगीज व इंग्रजांच्या पत्रामध्ये मिळतात. अवलंबून होते असे नव्हे, कारण पोर्तुगीजच एका पत्रामध्ये " आमच्या मुलुखातच धान्य पुरेश्या प्रमाणात पिकत नाही." अशी तक्रार केलेली आढळते. म्हणजे महाराजांनी केलेल्या मागणी मागे पोर्तुगीज म्हणतात त्याप्रमाणे वेगळेच राजकारण असेल. सन 1677 मध्ये पोर्तुगीज पत्रातील उल्लेख असा, " परंतु शिवाजीने भाताची ( तांदूळ ) जी चालू मागणी केली आहे, ती आमची परिक्षा पाहाण्यासाठी की काय कळत नाही. कारण त्याने सोळसुबांचे मानुएल गामा यांच्या कडे शंभर मुडे भात ( एक मुड्यामध्ये दहा कुडव (?) भात मावत असे. तो गवतापासून बनविला जाई ) घेण्याचा करार केल्याची बातमी आहे. त्याबद्दल इसारा म्हणून गामा यांना शिवाजीकडून दोनशे अशरफी मिळाल्याचेही कळते." पण या मागणी वरुन शिवाजी महाराज या बाबतीत किती दक्ष होते हे ध्यानी येते.
शिवनिधनासमयी सन 1680 मध्ये रायगडावरील धान्यसाठा असा होता, भात (तांदूळ) 17 हजार खंडी, तेल-70 हजार खंडी, 270 खंडी सैंधव, 200 खंडी जिरे, 200 खंडी गोपीचंदन व 200 खंडी गंधक या शिवाय नागली, उडीद, वरी, मीठ, तूरी, तूप इत्यादीचा मोठ्या प्रमाणात साठा असे. नासलेले कुजलेले तूप साठविण्यासाठी तुपाच्या विहीरी असत. युध्दामध्ये जखमा झालेल्या ठिकाणी हे कुजलेले तूप लावीत, त्यामुळे जखम चिघळत नसे व जखम लवकर भरुन येई. रायगडावरील धान्यकोठार आज देखील पाहिले म्हणजे त्याची साठविण्याची क्षमता किती मोठी होती हे लक्षात येते. पन्हाळगडावरील गंगा - यमुना ही धान्यकोठारे मुद्दाम जाऊन पहावीत अशी आहेत. यात एकूण 25 हजार खंडी धान्य मावत असे शिवाजी महाराजांचा समकालीन कवी परमानंद म्हणतो की, " गंगा - यमुना .....धान्याची अत्यंत मोठी कोठारे लाखो खंडी धान्याने काठोकाठ खच्चून भरलेली होती." एका उल्लेखा नुसार, " आत (जंजीर्यात) सामान (धान्य,दारुगोळा इ.) म्हणावे तरी दहा वर्षाचे आहे."
सन 1701 मध्ये औरंगजेबाने पन्हाळ्यास वेढा घातला असताना मराठा किल्लेदार त्रिंबकजी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात म्हणतात की, राजारामानी दोन हजार खंडी धान्य ठेवले होते." अनिश्चिततेच्या काळात मराठे गडावर फार मोठा साठा करुन ठेवीत नसत. सन 1704 मध्ये मोगलांनी राजगड जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाने नवीन किल्लेदारा सोबत दोनशे बैल वाहून नेऊ शकतील एवढे धान्य राजगडावर पाठवून दिले होते.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment