Total Pageviews

Monday, 7 September 2015

शिवछत्रपती व दुर्ग भाग;१

शिवछत्रपती व दुर्ग भाग;१
"गड उभारणारा महान अधिपती आणि पर्वतांना आपल्या अंकित करणारा शूर सत्ताधीश"
असे जे राजा भोजचे वर्णन करण्यात येते. ते योग्यच आहे. राजा भोजनीच रांगणा, पन्हाळागड, नांदगिरी, पांडवगड इत्यादी पंधरा दुर्ग उभारले. तसेच सातवाहन काळात किंवा त्यापूर्वी शिवनेरी, हडसर, जीवधन, उभारले गेले. साल्हेर, मुल्हेर, अहिवंत इत्यादी दुर्ग देखील प्राचीन आहेत. हडसर, चौल्हेर, कोथळीगड, परंडा, कंधार, उदगीर, सारखे भुईकोट व सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, अर्नाळा,जंजिरा, वसई हे जलदुर्ग आवर्जून पाहण्यासारखे आहेत. कातळामध्ये खोदलेले अव्दितीय प्रवेशव्दार, पायऱ्या पाहून डोळे विस्फारतात. साल्हेर, शिवनेरीचे एकामागे एक उभे असलेले सात दरवाजे थक्क करणारे आहेत, आणि देवगिरीसारख्या दुर्गाचे वर्णन तरी कसे करावे नरनाळा गाविलगड, हरिश्चंद्रगडचा प्रचंड विस्तार आणि पन्हाळागड, अहिवंताचे वर्णन करताना स्वतः शिवाजी महाराज म्हणतात की, "अहिवंत म्हणजे जैसा काही पन्हाळा त्याचेबरोबर समतुल्य आहे."
महाराष्ट्रात असे एकापेक्षा एक सरस दुर्ग आहेत. या दुर्गांच्या आश्रयाने अनेक सत्ता उदयास आल्या. देवगिरीच्या यादवांचे सामर्थ्य आणि संपत्तीचे वर्णन तर प्रसिद्धच आहे. पण अल्लाउद्दीनच्या समोर यादव राज्य गडगडले. मुस्लिम सत्तांच्या आक्रमक चढाईपुढे या बलिष्ठ दुर्गांनीदेखील मान तुकविली. सन 1470-71 मध्ये बहामनीचा वजीर महमंद गवान संगमेश्वरचा राजा जखूरायबद्दल म्हणतो की, "या प्रदेशाचा काफर राजा आपल्या दुर्गम आणि अभेदय किल्यामुळे गर्विष्ठ बनला होता." पण गवानने राजाच्या अभेद्य दुर्गांना नमवून संगमेश्वरच्या राजाचा पराभव करुन त्याला बहामनीचा मांडलिक बनवले.
राजगड तोरणा रायगडसारखे दुर्ग चौकीचे ठिकाण म्हणून वापरण्यात येऊ लागले. अनेक गड ओस पडले. त्यांचा धाक कधीच संपला होता. पण शिवाजी महाराजांनी या दुर्गांना सुवर्ण काळ प्राप्त करून दिला. राजगड तोरणा कडे पाहण्याचे धारिष्ठ्य मुस्लिम सत्तांनी दाखवले नाही. रायगडला त्यांनी असे बळकट केले की संपूर्ण जगाविरूद्ध तो लढण्यास सिद्ध झाला. दुर्गांच्या आश्रयाने त्यांनी स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण केले. दुर्गांचा असा विलक्षण धाक या आधी कुठल्या शत्रूनां वाटलं नव्हतं. दुर्ग निर्माण करणारे अनेकजन होऊन गेले, पण गडपती एकच होते ते म्हणजे शिवराय. दुर्ग म्हणजे शिवाजी राजे आणि शिवाजी राजे म्हणजे दुर्ग असे समीकरणच बनले. शिवरायांनी या दुर्गांच्या आश्रयाने संपूर्ण भारताचा इतिहास बदलून टाकला.
क्रमशः
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment