Total Pageviews

Monday, 7 September 2015

विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७)



विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७)-
मराठी राज्यांतील एक शूर सेनापति व मुत्सद्दी. याचें आडनांव दाणी. हा पुण्याजवळील सासवडचा राहणारा. याच्या वडील शाखेंतच नारो शंकर राजे बहाद्दर निपजला; विठ्ठल धाकट्या शाखेंतील होता. लहानपणीं फार हूड असल्यानें याला बापानें घरांतून घालवून दिलें. तेव्हां तो र्‍या सातार्‍यानजीक मर्ढें येथें अमृत स्वामीच्या सेवेसाठीं राहिला. तेथें शाहूच्या बक्षीशीं ओळख होऊन त्याच्या पागेंत याला नोकरी मिळाली. डुकराच्या शिकारींत धाडस दाखविल्यानें शाहूनें याला प्रथम १० स्वारांची मनसब दिली (१७२०). पुढें हबशाच्या मोहिमेंत यानें सिद्दी साताचे घोडे पकडून शौर्य गाजविल्यानें याला शाहूनें पेशव्यांच्या हाताखालीं सरदार नेमलें. थोरल्या बाजीरावाच्या बहुतेक मोहिमांत तो हजर असे. दयाबहाद्दर व बंगष यांच्यावरील स्वार्‍यांत त्यानें चांगला पराक्रम केला. वसईच्या मोहिमेंतहि तो दाखल झाला होता. नासिरजंगावरील १७४० च्या स्वारींत पेशव्यास मिळालेल्या जहागिरीची वहिवाट पेशव्यानें यालाच सांगितली. याचें कुलदैवत नृसिंह असल्यानें यानें नीरा नरसिंगपूर येथें त्याचें मोठें देऊळ बांधलें. कुंभेरी, ग्वाल्हेर, गोहद (१७५५), सावनूर वगैरे मोहिमांत त्यानें उत्तम कामगिरी केली. ग्वाल्हेरचा बळकट किल्ला यानेंच सर केला पुढें (१७५७) दिल्ली काबीज करून यानें बादशहाला आपल्या ताब्यांत घेतलें. यावेळीं त्याला बादशहानें विंचूरची जहागीर व राजा आणि उमदेतुल्मुल्क किताब दिले. कांहीं दिवस तो दिल्लीस मराठ्यांच्या तर्फें प्रतिनिधि होता. पानपतांतून तो जखमी होऊन माघारा आला त्याबद्दल त्याला स्वतःलाहि खंत वाटे. ''आम्हींहि आपल्या जीवास खातच आहों'' असें त्यानें राघोबादादास लिहिलें आहे. परंतु हा, अंताजी माणकेश्वर, हिंगणे, नारो शंकर वगैरे मंडळी पुढें पुढें डोईजड होऊन पेशव्यांनां मानीत नसत व कोंकणस्थ म्हणून त्यांचा मत्सर करीत असें तत्कालीन पत्रव्यवहारावरून दिसतें. थोरल्या माधवरावानीं याला १६८५००० रु. चा सरंजाम नेमून देला (१७६२); खेरीज हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राजेरजवाड्यांकडून ४५५०० रु. चीं वेगवेगळीं इनामें मिळालीं. १७६४ च्या अनेवाडीच्या हैदरावरील मोहिमेंत यानें चांगला पराक्रम केला.
विठ्ठल शिवदेव यांच्या मागून त्यांचे वडील चिरंजीव शिवाजी विठ्ठल हे गादीवर आले. हे पेशव्याबरोबर उत्तर हिंदुस्थानच्या स्वारींत असत. १७९४ त ते मृत्यु पावल्यावर त्यांचे कनिष्ठ बंधु खंडेराव गादीवर आले. हे खर्ड्याच्या लढाईंत होते. परंतु प्रकृति नीट नसल्यानें यांच्या हातून नांवाजण्याजोगी कामगिरी झाली नाहीं. यांस संतति नसल्यानें यांच्या पत्नीच्या मांडीवर त्यांच्याच आप्तघराण्यांतील एका मुलास दत्तक देऊन त्याचें विठ्ठलराव हें नामाभिधान ठेवलें. कर्नल वालेस साहेबाबरोबर पेढार्‍यांच्या बंदोबस्ताकरितां हे गेले होते. या नंतर रघुनाथराव विंचूरकर हे गादीवर आले. यांचे कारकीर्दीनंतर विंचूरकराकडे दरसाल साठ हजारांची जहागिरी राहिली व बाकीची खालसा झाली. (विंचूरकर घराण्याचा इतिहास; गाडगील-विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचें चरित्र; धनूर्धारी).
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment