मुंबईकरांनी ६ अॉक्टोबर १६७९ सूरतेला कळविले की,
"उद्या केज्विनच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० शिपाई खांदेरीला वेढा देण्याकरिता निघतील. आमची कित्येक गलबते व्यापाराकरिता बाहेर गेल्यामुळे दोन गुरबा भाड्याने घेतल्या. १० दिवसांनी 'हंटर' येऊन पोहचल्यावर त्यांना सोडून देऊ. बेटाला पक्का वेढा पडल्यास पाण्याचा तुटवडा पडून तेथील लोक शरण येतील. युध्दावर इतके सैन्य पाठविल्यामुळे मुंबईत फक्त ५० शिपाई राहिले आहेत. करितां आणखी ५० शिपाई ठेवणे जरुर आहे." मुंबईकर कॕप्टन केज्विनला सूचना देतात की, "तुमच्या ताब्यात 'रिव्हेंज' फ्रिगेट, २ गुरबा, ३ शिबाडे, व ३ मचवे अशी ८ गलबते व अमलदार वगळून १८८ शिपाई देत आहोत. तुम्ही खांदेरीला वेढा घालून किनाऱ्याशी या बेटाचे दळणवळण तोडावे.
तुम्हाला पाठविण्याचे मुख्य कारण असे आहे की, दौलतखानाचे २० गुरबाचे आरमार त्या बेटाच्या मदतीकरितां येत असल्याची बातमी आहे. ते तुम्हाला दिसल्यावर एक लहान बोट पाठवून दौलतखानाला आपल्या हक्कांची जाणीव करुन द्यावी, आणि तसे काही नच जमल्यास धैर्याने युद्ध करावे. तो तुमच्याशी युद्ध न देताच मध्ये आखातांत आडवा येऊन राहिल तर तुम्हीही नांगर उचलून त्याच्याबरोबर राहून त्याला मुंबई बेटावर उतरुं देऊ नये."
No comments:
Post a Comment