!!...........सुरत लूट...........!! भाग - १
मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लुट. शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस, या सर्व काळामधे महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव, या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्हे तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती, मुघली गोटात शिरून. चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक.(स.ब)
गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यावधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले. या सुरत शहरामधून मिळणाऱ्या जकाती पोटीच औरंगजेबास वार्षिक १२ लक्ष रुपये मिळत असत डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरत मधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड-जवाहीर याने सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत, अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अश्या अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. ह्या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्य साधारण महत्व होते कारण यावनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव ‘सूर्यपूर’ असे होते. तापी नदीच्या दक्षिण तिरावर वसलेले, समुद्र किनार्यापासून २७ मैल आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती पण त्याभोवती यावेळी तटबंदी देखील नव्हती (अ.हो.मो).
सुरत राजगडापासून १५० कोस दूर आणि हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणारा, अश्या या सोन्याच्या लंकेची खडा-न-खडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली. सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे मांडला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले ” सुरत मारील्याने अगणित द्रव्य मिळेल “. बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर ” लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे ” या विचारे महाराजांनी स्वत: जाण्याचे निश्चित केले (स.ब). सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया शके १५८५ म्हणजेच ६ डिसें १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले. मजल दर मजल करीत महाराज ३१ डिसें रोजी त्र्यंबकेश्वरला पोहोचले (शि.द.या) महाराज कुठल्या मार्गाने गेले हे पुराव्या अभावी सांगता येत नाही, फक्त शिवापूर दफ्तर यादी मधेच महाराज त्र्यंबकेश्वरला गेल्याची नोंद मिळते. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन महाराज ४ जाने १६६४ रोजी सुरतेच्या अलीकडे घणदेवी इथे पोहचले (प.सा.सं- ले-९७०). यावेळी सुरतेचा मुघली सुभेदार होता कपटी इनायतखान. जन्मजात भ्रष्टाचारी, जुलमी, बादशाहाला भरण्याचा व्यापाऱ्यांचा पैसा सुभेदार सांगेल ती किंमत आणि म्हणू ते वजन (चांदी वैगरे) असे म्हणून घेत असे. यामुळे सुरतेमधील व्यापारी हवालदिल झाले होते. सुरतेच्या सुभेदाराबद्दल डच, इराणी या सर्व लोकांची तक्रार होती.
http://itihasbynikhilaghade,blogspot.com
http://itihasbynikhilaghade,blogspot.com
No comments:
Post a Comment