Total Pageviews

Tuesday, 8 September 2015

सरदार सूर्यराव काकडे

साल्हेरीच्या गडाला पन्नास हजारांची मोगल फौज वेढा देऊन बसली होती. गडाच्या सर्व बाजूंनी वेढा जारी होता. मोगल सरदारांचे डेरे, शामियाने, छावण्यांच्या राहुट्या ठिकठिकाणी दिसत होत्या. ऐशआरामी थाटात इखलासखान वेढ्यावर नजर ठेवून होता. त्याच्या बरोबर मुहकमसिंग चंदावत, अमरसिंह चंदावत यासारखे अनेक मोठमोठे सरदार होते. शाही थाटात, ऐशआरामात हा वेढा चालू होता. औरंगजेबाने अफाट दौलत आणि अगणित फौज दिल्यामुळे कुणालाच वेळकाळाचे भान नव्हते.
राजांचे हेर वेढा अजमावून परतले. दबा धरलेल्या सर्व मराठी फौजांना प्रतापरावांनी हुकुम दिले.
रात्र सरली. सूर्य उगवला. साल्हेरचा मराठी किल्लेदार गडावरुन नजर फिरवीत होता. दृश्य नेहमीचेच होते. आता थोड्या वेळाने वेढ्यातून तोफा डागल्या जाणार होत्या. एखादी तुकडी गडाला भिडणार होती; गडावरुन तोफा डागल्या, की परत वेढ्यात परतणार होती. दिवसातून दोन-तीन वेळा हे होणार होते. सूर्य मावळणार होता; काळजीची रात्र परतणार होती. किल्लेदाराला हे नित्याचे झाले होते. ठरल्याप्रमाणे तो तटावरुन फिरत होता; पहारे बदलीत होता. हे किती दिवस चालणार, हे त्याला माहित नव्हते. जिवाची खंत नव्हती, तर तो विचार तरी कशाला करील?
मोगल छावणी सकाळच्या उन्हात आळस झाडीत होती. घोड्यांच्या खिंकाळण्याने, हत्तींच्या चीत्काराने छावणी पुरी जागी झाली. इखलासखान वेढ्याचा बेत ठरविण्यात टवकारुन ऐकु लागला. छावणीत दुसऱ्याच क्षणी गडबड उडाली. इखलासखानाच्या डेर्यात जासूद घुसला. कुर्निसात करुन तो म्हणाला,
'खानसाब ! मरगठ्ठे आ गये !'
'खानसाब ! मरगठ्ठे आ गये !'
खानाचा कानांवर विश्वास बसेना !
.....मराठे आले !
खानाने भराभर हुकुम दिले. सार्या छावणीत एकच गडबड उडाली. एका छावणीतून दुसऱ्या छावणीत स्वार धावू लागले. हत्तीवर हौदे चढले. घोड्यावर खोगिरे चढविली गेली. इखलासखान चिलखत घालून हत्तीवर बसला. सारी फौज तयार होत असता त्यांना मराठे दिसले.
इखलासखानाने आवेशाने हुकुम दिला. मोगल फौज मराठ्यांना भिडली. त्याच वेळी वेढ्याच्या दुसऱ्या बाजूने मराठे उतरले. घनघोर युध्दाला सुरुवात झाली. 'हर हर महादेव ' च्या गर्जनेने साल्हेरचा परिसर घुमला. टापांचा आवाज, शस्त्रांचा खणखणाट, घोड्यांचे - हत्तींचे ओरडणे, वर्मी घाव लागताच उठणारी अंतकाळची आर्ता किंकाळी अशा अनेक आवाजांनी भूमी कंपित होत होती. दोन्ही बाजूंनी हजारो माणसे पडली. रक्ताचे पूर वाहिले. मोगल सेनेला जीव वाचवता पुरेवाट झाली. मोरोपंत, आनंदराव, प्रतापराव वगैरे उमरावांनी शिकस्त केली.
या विजयात मराठ्यांना सहा हजार घोडे, शंभरावर हत्ती आणि हजारो उंट मिळाले. लक्षवधी रुपयांचे जडजवाहीर, मालमत्ता, खजिना हाती आला. खासे इखलासखान पाडाव जाले. मोगलाईचे बावीस नामांकित वजीर धरले.
या युध्दात मराठ्यांचे अनेक वीर पडले; पण त्यांत ज्याच्या शौर्याने राणास शोभा आणली, आणि मृत्यूने विजयाचा आनंद लाभू दिला नाही, असा एक नामांकित सरदार होता. त्याचे नाव
" सूर्यराव काकडे."
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment