Total Pageviews

Wednesday, 2 September 2015

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग ... ! भाग १


छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग ... !
भाग १
आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ.
राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते. 'सह्याद्री' हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'. जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड, कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.

स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!!
सांभार : http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment