छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल ... !
भाग २
हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे.पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको." संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना 'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें' असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला 'कानून जाबता' लागू होताच.
शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.
शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता - सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे 'व्यापार विषयक धोरण' हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,"बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे." पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत.
सांभार : सांभार : http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment