Total Pageviews

Friday, 4 September 2015

दक्षिणदिग्विजय किंवा कर्नाटकची स्वारी

दक्षिणदिग्विजय किंवा कर्नाटकची स्वारी शिवाजी महाराजांच्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमांत विशेष यशस्वी व कीर्ती वाढविणारी आणि महान संकटकाली हिंदवी स्वराज्यास आश्रयस्थान झालेली राज्याची भूमि म्हटली तर ती त्यांची ही कर्नाटकची स्वारी होय. महाराजांनी राज्याभिषेक करवून घेऊन छत्रपतीपद मिळविले. परंतु या छत्रपतीपदाचा महिमा याच कर्नाटकांतील राजकारणामुळे जगाला पटविता आला. हिंदुस्थानातील तीन राहिलेल्या प्रमुख शाह्यांपैकी एक म्हणजे कुत्बशाही. तेथील राजक्रांतीमुळे व हिंदूनी राजकारभारात प्रामाण्य संपादिल्यामुळे कुत्बशाहाला 'हिंदवी स्वराज्या' ला मान्यता देणे जरूर भासले. परंतु वीसपंचवीस वर्षे झगडूनही शिवाजी महाराजांना मोगली व आदिलशाही शक्तिसामर्थ्याच्या विरोधाला पायबंद घालता आला नव्हता. मोगली सैन्याला हिंदुस्थानच्या उत्तर पठाणी भागांतून मनुष्य व द्रव्यबल प्राप्त होत असल्याने आणि आदिलशाहाला दक्षिणी हिंदू राजांकडून मुबलक पैसा व तोफांची मदत मिळत राहिल्याने या शाह्यांच्या विरोधांतून हिंदवी राज्याची सीमा स्थिरतेत टिकविणे म्हणजे या दोघांच्या शक्तिसामर्थ्याला तोंड देत राहाणे आवश्यक झाले होते. औरंगजेब काबुलकंदाहारकडे गुंतल्याने उत्तरेकडील मदत कमी झाल्याने शिवाजीला मोगलाविरूध्द लढून त्याचा बराच मुलूख आक्रमितालेला आला होता. पण विजापुरकरांची तशी स्थिती नव्हती. विजापुरकरांनी सर्व बारिकसारिक हिंदू राज्ये उलथीपलथी केल्याने त्यांना दक्षिण कर्नाटकात त्याचे सर्व लक्ष वेधील असा शत्रूच राहिला नव्हता. उलट त्यांना वाटेल तसा पैसा उकळणे सोपे जात होते. विजापुरकरांना कायमचा पायबंद घालावयाचा तर त्यांना कर्नाटकातच त्यांचे सर्व लक्ष वेधील असा शत्रूच राहिला नव्हता. कुत्बशाहाने आदिलशाही सरदारांनी बळकाविलेला मुलूख परत मिळविण्यासाठी बरीच वर्षे झगडा दिला परंतु अयशस्वी ठरला होता. तेव्हा असे प्रबल शत्रू निर्माण केल्याशिवाय व उत्तरेकडून मराठ्यांचे हल्ले व दक्षिणेकडून कर्नाटकातून हल्ले झाल्यास आघाडी व पीछाडीवरून आदिलशाही सैन्याचा, कोंडमारा करिता येऊन आदिलशाहीला पायबंद घालण्यास विलंब लागणार नाही, असा कुत्बशाही सरदारांनी विचार केला. शिवाय आदिलशाहाचे कर्नाटकांतील सरदारही आदिलशाहीविरूध्द सारखी बंडाळी करीत होते. त्यांचाही कुत्बशाही मुलखास त्रास होत होता. परंतु ते एका छत्राखाली जमण्यासही तयार नव्हते. या सर्वांना एकाच अमलाखाली आणून आदिलशाही आक्रमक उलथवून पाडावयाची व सांप्रत मराठ्यांना जे वरून मोगल व खालून आदिलशाहा यांच्या मार्यांत दोन्ही कडे अवधान राखून राजकारण करावे लागत होते ती अडचण दूर करण्यासाठी म्हणून पिछाडीवरून मारा करणाऱ्या आदिलशाही सैन्याला कायमचे दुर्बल करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची व त्याबरोबर कर्नाटकांतील हिंदू मांडलिक सरदारांची मदत अपेक्षून मादण्णाने शिवाजी महाराजांशी राजकारण केले. त्यात जबरदस्त भिंत उभारली गेल्याने बरीच वर्षे चालू असलेले कटकट मिटली की, नंतर उत्तर हिंदुस्थानांतून येणाऱ्या मोगलाची खाली उतरण्याची वाटच बंद करावयाची हे या मोहिमेतील राजकारण होते व ते कसे यशस्वी झाले हे विजापुरकरांच्या चळवळीच्या पुढील व पूर्वीचा इतिहास ताडून पाहिल्यास सहज दिसून येते.

No comments:

Post a Comment