Total Pageviews

Thursday, 10 September 2015

संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी : भाग 5



व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 5
विजरई ‘कोंदि द आल्व्होर’ याच्या दुटप्पी धोरणाचा आणखी एक नमुना म्हणजे त्याने औरंगजेबाच्या पत्राला दिलेले उत्तर यात तो म्हणतो – “त्याचे (संभाजीचे) पत्र आपणास मिळण्यापूर्वीच आपण संभाजीच्या विनवणीकडे लक्ष न देता मोगल सैन्यास पोर्तुगीज हद्दीतून वाट देण्यास आपल्या अधिका-यास ताकीद दिली होती. ह्या व इतर मदतीबद्दल जो कोकणचा प्रदेश मोगल जिंकून घेतील तो पोर्तुगीजास बहाल करावा”. विजरईच्या आणखी काही अपेक्षा होत्या. त्यास वाटत होते मोगल-मराठा संघर्षामधे संभाजीचा पराभव हा निश्चित होईल तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून दक्षिण कोकण पोर्तुगीज अंमलाखाली आणावा हे त्याचे स्वप्न होते. विजरई इथेच थांबला नाही, तर त्याने उत्तर कोकणातून (साष्टी व वसई प्रांत) देखील मुघलांना जाण्यास वाट दिली. मोगलांच्या आरमारास प्रतिबंध करण्यासाठी संभाजी महाराजांनी कल्याण नजीक ‘पारसिक’ येथे किल्ला बांधण्याचे ठरवले आहे ही बातमी समजताच त्याने अंजदीव बेटा प्रमाणे तिथे देखील किल्ला बांधला.(पो.म.सं-९१) यावरून हे प्रत्ययास येते की ही फिरंगी मंडळी अत्यंत जागरूक होती. यांच्या चेह-यावर एक आणि मनात एक असे दुटप्पी वागणे असत. अश्या वागण्यामुळे मराठा -पोर्तुगीज संबधामधे वितुष्ट येण्यास सुरवात झालीच होती. त्यात मोगलांना केलेल्या उघड मदतीमुळे मराठा-पोर्तुगीज सलोख्याचे संबध जवळ-जवळ संपुष्टात आले होते.
कोंदि द आल्व्होर याचे साहस तर एवढे वाढले की जणू त्याची काही परिसीमाच नसावी. त्याने आता खुद्द संभाजी महाराजांनाच जिवंत पकडण्याचा मनसुबा रचला. असे करून औरंगजेबाची मर्जी संपादन करणे आणि आपल्या पदरात कोकणातील मुलुख पाडून घेणे हे प्रयोजन ! त्याने रचलेल्या कटाचा उल्लेख मिळतो तो पुढील प्रमाणे – ” प्रतिवर्षी श्रावण महिन्यात गोकुळअष्टमीस भतग्रामातील नारावे येथे जत्रा भरत असे. त्यावेळी पंचगंगा ह्या नदीत स्नान करण्यासाठी हजारो लोक जातात. ह्या नदीच्या दक्षिण तीरावर दिवाडी हे बेट आहे व उत्तर तीरावर भतग्रामातील नारावे हे गाव आहे. दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या अमलाखाली होते तर नारावे हे संभाजीच्या राज्यात होते दि. १२-८-६८३ रोजी कोंदि द आल्व्होर यास बातमी आली की संभाजीराजा नारव्यास नदीत स्नान करण्यासाठी येणार आहे असे झाल्यास त्यावर अचानक छापा घालून पकडण्याचा विचार होता पण संभाजी महाराज आलेच नाही आणि कोंदि द आल्व्होर याचा बेत फसला ” (पो.म.सं-९३)
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment