Total Pageviews

Thursday, 10 September 2015

संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी : भाग 3

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 3
१६८२ च्या सुरवातीस संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदीव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी केली. विजरई याचा सेक्रेटरी ‘दोतार-लुईस-गोंसाल्व्हीस-कोत’ याने ही बातमी पत्राद्वारे कळवली त्यात तो लिहितो – ” आताच दुभाष्याने मला येऊन सांगितले, संभाजीने दगड व चुना अंजदीव बेटाकडे पाठवला असून तेथील कामास जो पैसा खर्च होईल तो खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. ” या पत्राची तारीख आहे दि.२९-४-१६८२.बातमी मिळताच विजरईने त्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि लगेच अंजदीव बेट मराठ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वी आपण बेटावर सामान व माणसे पाठवून किल्ला बांधावा व तेथे सहा तोफा ठेवाव्या तसेच सदर बेटाच्या रक्षणार्थ काही लढाऊ ‘तारवे’ ठेवावी अशी आज्ञा केली. अंजदीव बेट मराठ्यांकडे जाणे ही धोक्याची घंटा होती हे विजरई चांगल्याच प्रकारे जाणून होता. कर्नाटकातून येणारी साधन-सामग्री सागरी मार्गाने अंजदीव बेटाच्या जवळून येत असे. शिवाजी महाराजांनी ‘हेंद्री-केंद्री’ येथे किल्ला बांधल्यापासून चौलला उपद्रव होऊ लागला होता हे तो जाणून होता व असा धोका परत न पत्करणे योग्यच हे ठरवून त्यांनी अंजदीव बेटाचा ताबा घेतला. दि.२-७-१६८२ रोजी आमरू सिमोंइस पेरैर याने किल्ला बांधण्यास सुरवात केली व ६ महिन्याच्या आत किल्ला बांधून काढला. संभाजी महाराजांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या वकिलामार्फत विजरईकडे विचारणा केली असता – ” हे बेट आमचे असल्यामुळे संभाजीस बोलण्याचा अधिकार नाही असे उर्मटपणे उत्तर विजरईने दिले “ (पो.म.सं-८८) संभाजी महाराजांना ही गोष्ट सहन झाली नाही, तरीदेखील संभाजी महाराजांनी अगोदर थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले. मराठा पोर्तुगीज संबंध बिघडण्यास सुरवात झाली होती खरी पण यावेळी कुणीच उघडपणे शत्रुत्व घेत नव्हते. दि.२८-७-१६८२ रोजी विजरई याने संभाजी महाराजांना पुत्रप्राप्ती झाल्यामुळे अभिनंदनाचे एक पत्र पाठवले. सोबत त्याने नजराणा म्हणून एक दागिना पाठवला. पत्रास उत्तर म्हणून संभाजी महाराजांनी विजरईस आपण डिचोली आणि कुडाळ परिसरात दारूचे (तोफेची दारू) कारखाने उभारल्याची बातमी दिली. कर्नाटक येथून मराठ्यांसाठी येणा-या सामानास पोर्तुगीजांच्या आरमाराचा त्रास होऊ नये असे देखील या पत्रामधे नमूद करण्यात आले होते.(पो.म.सं-९०) 
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment