शिवकालीन दुष्काळनिवारण !
प्राचीन महाराष्ट्राचा आढावा घेतल्यास दोन हजार वर्षांपूर्वी तेर, पैठण, नाशिक, पुण्यनगरी (कोल्हापूर) ही वैभवसंपन्न शहरे ही मोठ्या नदीकाठी होती. त्यांची नावेही त्या पद्धतीची होती. अश्मक देश म्हणजे अहमदनगर आणि बीड, मुलक देश औरंगाबाद, कुंतल देश म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, मिरज. लेडन म्हणजे नाशिक. पुढे महाराष्ट्राचे कोकण घाटमाथा आणि देश असे वर्णन केले जाऊ लागले. अशा प्रकारे नावे बदलली परंतु परिस्थिती कायम राहिली. त्यामुळे शिवकालखंडापासून ते आजतागायत दुष्काळ हा शब्द नवीन नाही. फरक फक्त तो निवारण करणा-या सत्तेतला आहे.
शिवकाळात सर्वांत मोठा दुष्काळ इ.स. १६३० साली पडला. ज्याला थोरला दुष्काळ किंवा दुर्गादेवीचा दुष्काळ म्हटले जाते. याविषयी अब्दुल हमिद लाहोरी म्हणतो की, भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वत:ला विकायला तयार होते. परंतु घेणारा कोणी नव्हता. मृतांच्या हाडाची भुकटी पिठात टाकून ते विकले जाऊ लागले. शेवटी दारिद्र्य एवढ्या शिगेला पोहोचले की माणसेच माणसाला खाऊ लागली. या दुष्काळाचा असर पुढे १०-१५ वर्षे राहिला.
अशा बिकट अवस्थेत छत्रपती शिवरायांनी इ.स. १६४५ साली सत्ता हातात घेतली. राजांनी सुरू केलेल्या लढ्याचा असर पुढे १७०७ पर्यंत टिकला. म्हणून या कालखंडाला शिवकालखंड म्हटले जाते.
दुष्काळजन्य परिस्थिती खरे तर १९७२ पर्यंतच्या दुष्काळाचा आढावा घेतल्यानंतर असे दिसून येते की याअगोदरचे दुष्काळ हे पाण्याचे नाही तर अन्नाचे होते हे ध्यानात घेतले पाहिजे. आपण फक्त राजांची राजधानी रायगडाचा विचार केला तर गडाच्या भोवती काळ आणि गांधारी नदीच्या डोहाची लांबी ३०० ३० फूट असून त्याला उन्हाळ्यातही मुबलक पाणी होते तर गडावर गंगासागर, कुशावर्त आणि हत्ती तलावामुळे वर्षभर मुबलक पाणी मिळत असे. आता या तलावात काहीच पाणी नसले तरी त्याकाळी गंगासागरात चवदार पाणी असल्याचा उल्लेख सापडतो.
त्याचबरोबर १६६४ साली बांधलेल्या ४८ एकरवरील सिंधुदुर्गाला चारी बाजूंनी समुद्रांनी वेढले असले तरी गडामध्ये दूधबाव, दहीबाव व साखरबाव अशा तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. हे नवलच.
शके १६९५ ते १९ ऑक्टोबर १६९९ अशी चार वर्षे दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाने सोलापूरजवळच्या ब्रह्मपुरीजवळ मुक्काम का टाकला ? ३ लाख स्वार, ४ लाख पायदळ, ५० हजार उंट, ३ हजार हत्ती आणि ३० मैल परिक्षेत्रात पसरलेल्या छावणीला बारमाही पाणी पुरविण्याचे काम एकट्या भीमा नदीने केले. तर डिसेंबर महिन्यात सांगोला तालुक्यातील खवासपूरगावी माण नदीत औरंगजेबाचा मुक्काम असताना कधी नाही तो वर पडलेल्या पावसाने नदीला पूर येऊन चिखलात पाय अडकून बादशहा कायमचाच लंगडा झाला. तर कृष्णा नदी पार करायला मोगली फौजांना १० दिवस लागले होते.
याचप्रमाणे सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा चार महिने सतत पाऊस चालू होता. अशारीतीने पाण्याचे दुर्भिक्ष नसले तरी त्याचा अतिवापरही नव्हता. त्या काळचा दुष्काळ हा अन्नधान्याचा होता. त्यामुळे माणसावर संकट येऊन अन्नावाचून लोक तडफडून मरत असत. यालाच अस्मानी संकट म्हटले जाते.
तर सुलतानी संकटात शत्रूचे सैन्य जनतेची लुटालूट करत जाताना उभ्या पिकातून सैन्य घातल्यामुळे पिके उद्ध्वस्त होत असत. यालाच सुलतानी संकट म्हटले जाऊ लागले. याचबरोबर गावपातळीवरील कुलकर्णी, देशमुख, देशपांडे यासारख्या वतनदारांनी वाटेल त्या पद्धतीने सारा वसुली केल्याने शेतक-याचे कंबरडेच मोडले. या सर्वांचा राजांनी बारकाईने अभ्यास केला.
राजांचे दुष्काळनिवारणाचे धोरण-
शिवकालखंडात ऊस, चिंच, भाजीपाला, हळद, तांदूळ, नाचणी, ज्वारी वगैरे नगदी पिके होती. यावरची कर आकारणी एकाच पद्धतीने आणि तीही वतनदारी पद्धतीने होती. शिवरायांनी ही पद्धत बंद करून रयतवारी पद्धत आणली. यामध्ये वतनाऐवजी अधिका-यांना रोख पगार दिला जाऊ लागला. जमिनीचा सारा घेताना वाड्यावर बसून आणेवारी ठरविण्यापेक्षा ‘नजर पाहणी’ ची पद्धत सुरू केली. त्यामुळे दुष्काळात उत्पन्न कमी झाले तर सारा कमी झाला. शेतक-यांना हा दिलासा मिळाला. दुष्काळ पडल्यानंतर सावकारांची चांदी व्हायची. व्याजाचे दर ३७ ते ६० टक्क्यांपर्यंत असायचे. अफजल खानाला देण्यासाठी फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरांनी तलवडीच्या सावकाराकडून ६०,००० रुपये ६० टक्के दराने काढले होते. धान्याच्या स्वरूपातील कर्ज हे दुणीने आकारले जायचे.
अशा सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी राजांनी तगाईची पद्धत सुरू केली. तगाई म्हणजे सरकारी कर्ज. यामध्ये शेतक-यांना बैल-बारदाणा, बी-बियाणे, शेतीची अवजारे व विहीर खोदण्यासाठी रोख स्वरूपात कर्ज उपलब्ध करून दिले जात असे. यातही वसुली करताना पीकपाणी पाहूनच वसुली होत असे. हा राजाचा महत्त्वपूर्ण निर्णय होता.
दुष्काळात चोरांचा सुळसुळाट वाढायचा. यांचा बंदोबस्त कसा केला याविषयी सभासद म्हणतो, प्रति गावास रखवाली एक बेरड त्या प्रांतात असावा. चोरी जालिया त्याने भरून द्यावी, नाही तर पत्ता लावून घ्यावा. ऐसे केले यांजमुळे राष्ट्रात कोठेही चोरभय नाही ऐसे जाले.
शिवकाळात बु-हाणपूर ते गोवळकोंडा हा एकमेव महामार्ग असला तरी राजांनी व्यापाराला उत्तेजन दिल्याने पाषाण, जिजापुरा, मलपुरा, खेळपुरा या पेठा निर्माण झाल्या. सोलापूरचे तलम धोतर प्रसिद्ध असले तरी सासवडच्या धोतराला ६ रु. ८ आणे मोजावे लागायचे. पागोट्यासाठी नांदेड, पैठण, जुन्नर प्रसिद्ध होते. परदेशाचा कपडाही मोठ्या प्रमाणात होता.
पाण्यामुळे दुष्काळ होऊ नये म्हणून छोटे तलाव, बांध बांधले. कोकणात लाल मातीमुळे बांध टिकावा म्हणून त्यात झाडाच्या फांद्या, गवत घालून त्याची मजबुती केली जायची. याच बांधाच्या शेजारी विहिरी खोदून मोटेने पाणी दिले जायचे. त्यामुळे सिंचन व्यवस्था ही मोटस्थल व पाटस्थल अशा दोन पद्धतीने होती.
नदीवर बांध घालण्यावरून काहीवेळा संघर्ष व्हायचा. त्यानुसार १६७६ साली नाशिक जिल्ह्यात बाणगंगा नदीवर बांध घालण्यावरून मोहाडी आणि जानोरी गावात तंटा उभा राहिला. तेव्हा न्यायालयात याचा खटला चालून निकाल दिला की नदी हे कुदरती देण, कोणी अडवायचे काम नाही, बांधाचे काम सुरू ठेवावे. सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या संघर्षासाठी हा एक आदर्शच म्हणावा लागेल. पाण्यासाठी राजे किती जागरूक होते हे त्यांच्या रायगडावरील वाड्यात सापडलेल्या हौदावरून दिसून येते.
पुढे नरसापूरचा तलाव दुरुस्त करण्याकरिता ८०० रु. खर्च आला तेव्हा यातील ४०० रु. लोकवर्गणीतून जमा झाले. ही शिकवण महत्त्वाची होती. पाण्यामुळे शिवकाळात अनेक फळबागांची निर्मिती झाली.
या सर्व बाबी केल्यानंतर प्रशासनातील मुख्य घटकाला ताकीद देऊन ते म्हणतात - विलायतीस तसवीस देऊ लागला. ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीवमात्र राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे ऐसे होईल की मोगल मुलखात आले त्याहूनी अधिक तुम्ही ! ऐसा तळतळाट होईल. सारी बदनामी तुम्हावरी येईल. सिपाही हो अगर पावखलक हो. रयतेस काडीचा आजार द्यायचा गरज नाही.
रयत आणि राजा यांच्यातील नंतर कमी झाल्याने शिवरायांनी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांवर मात करून स्वराज्याची निर्मिती केली
|| जय भवानी जय शिवराय ||
No comments:
Post a Comment