Total Pageviews

Monday, 1 February 2016

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे, कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होय. (यामध्ये काही ठीकाणी दुमत किंवा थोडा बदल आहे)
प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली. सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.
" पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला,आणि 'समयास कैसा पावला नाहींस?'म्हणून शब्द लावून,सरनोबती दूर करून,राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता,त्यांचे नाव दूर करून,प्रतापराव ठेविले,आणि सरनोबती दिधली.प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले.पागेस घोडीं खरेदी केलीं.पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले.असा जमाव पोक्त केला.चहूं पादशाहीत दावा लाविला."

विजापूराहून आलेल्या बेलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता,रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला.प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला.बहलोलखान आपल्या सैन्यासह शरण आला.शरण आलेल्या बहलोलखानास मोठ्या मनांनी प्रतापरावांनी त्यांस सोडून दिले.
महाराजांना हे कळाले . 'रयतेचे हाल करणार्‍याला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.' असे पत्र महाराजांनी प्रतापरावास धाडिले.राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे.असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले.त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी हे वीर होते.या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारिले.पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे सहा वीर मरण पावले.केवढे हे शौर्य या सात वीरांचे? साक्षात समोर मृत्यु आहे हे माहीत असून,हजारों सैन्यावरी सात वीर चालून गेले.पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या हवाली केले.ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दु:ख झाले.या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला.

प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी  शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी  गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.या सात वीरांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्यातील मराठा मावळा पेटून उठला.या वीरांचा पराक्रम इतिहासात कायमचा अमर झाला.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.

सरसेनापती प्रतापराव गुजरांनंतर शिवरायांनी हंसाजी उर्फ हंबीरराव मोहीते यांना सरसेनापती पद बहाल केले. जानकिबाई, खंडोजी, सिदोजी, जगजीवन ही प्रतापरावांची मुले होत. तर पेशवाईत मोलाची कामगीरी बजाऊन स्वत:चे स्थान निर्माण करणारा सयाजी गुजर. तसेच पेशवाईच्या अखेरीस छत्रपती प्रतापसिंह महाराजांना मदत करणारा रघूनाथराव गुजर हे तर त्यांचे नावाजलेले वंशज होत.

त्यातील प्रतापराव गुजरांची दोन मुले खंडोजी व जगजीवन यांनीसुद्धा स्वराज्यासाठी आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक वेगळा आदर्श निर्माण केला. संभाजीपुत्र शाहू महाराजांना औरंगजेबाने १८ वर्षे कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांच्यासोबत ही दोन्ही भावंडे फक्त कैदेतच राहिली असे नाही तर ज्या वेळी बादशहाने शाहूला मुस्लिम धर्माची दीक्षा देण्याचा आदेश दिला तेव्हा स्वत: या दोघांनी राजांसाठी मुस्लिम धर्म स्वीकारला.
आजही सज्जनगडाजवळ कामथी नावाच्या गावात प्रतापरावांचे वंशज राहतात. पैकी भाऊसाहेब हैबतराव गुजर देशमुख हे हिंदू तर मज्जिदसाहेब अमिनसाहेब देशमुख हे मुस्लिम आहेत. भोसरे गावात आता फक्त एक भिंत शिल्लक आहे तर कामथी गाव उरमोडी धरणात गेल्याने वंशज मावेजासाठी हेलपाटे घालताहेत. एक वंशज नागपुरात राहतात. अलीकडे गुजरांची कन्या सातारच्या छत्रपतींना दिली होती. एकंदर प्रतापरावांसह सात वीरांची बूज राखत नेसरीकरांनी आपल्या गावात त्यांचे भव्य स्मारक उभे केले आहे. शेवटी इतिहासाचे वेड लागल्याशिवाय अशा वेड्या वीरांची कथा समजत नाही हेच खरे !

7 comments:

  1. Nice article.... very helpful... thank you

    ReplyDelete
  2. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. मानाचा मुजरा स्वामी निष्ठेला

    ReplyDelete
  4. अभिमानास्पद पराक्रम...मानाचा मुजरा

    ReplyDelete
  5. प्रतापराव गुजरांचे नाव आदराने घ्या

    ReplyDelete
  6. भास्कर कुलकर्णीबद्दल जरा संशय वाटतोयं!

    ReplyDelete