Total Pageviews

Monday, 7 September 2015

छत्रपती प्रतापसिंह भोसले



छत्रपती प्रतापसिंह भोसले
हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.
सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले.
तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसर्‍या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ ला दुसर्‍या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या.
पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.

No comments:

Post a Comment