Total Pageviews

Wednesday, 2 September 2015

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... भाग १ "


छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...
भाग १
"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'

मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.
कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment