Total Pageviews

Tuesday, 8 September 2015

कशी झाली दुर्ग निर्मिती

कशी झाली दुर्ग निर्मिती
दुर्ग म्हणजे किल्ला असे जाणावे. दुर्ग मानवजातीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे अंग जेव्हा पासून मानवाला स्वतःची व आपल्या सोबत असणाऱ्या लोकांची सुरक्षिततेची गरज निर्माण झाली, त्यावेळेपासून अगदी प्रारंभ अवस्थेत काअसेना, पण दुर्गांच्या निर्मितीला सुरुवात झाली असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. शत्रूःपासून स्वतःच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी व आपण आपल्या स्थानी सुरक्षित आहोत याची जाणीव झाल्यावर दुसऱ्यावर अधिकार दाखविण्यासाठी, हल्लासाठी, सत्तेसाठी या दुर्गांचा उपयोग होण्यास सुरूवात झाली. मानव समाज जस जसा विकसित होत गेला, त्यासोबत दुर्गांचाही विकास होत गेला.
दुर्गांचा इतिहास म्हणजेच राजांचा इतिहास, त्यांच्या युद्धाचा इतिहास. अनेक राज्ये, राजे या दुर्गांच्या आश्रयाने उदयास आले, राज्य केले व दुर्ग गमावल्याने राज्य देखील गमवावे लागले. मध्ययुगीन भारतात राजस्थान व उत्तर भारतातील अशी अनेक उदाहरणे देता येतील. दक्षिणेत देखील अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीचा आवळल्यावर संपूर्ण यादव राज्याने शरणागती पत्करली. विजापूर व गोवळकोंड्याची कुतुबशाही यांची देखील हीच गत झाली. मध्ययुगीन काळात संपूर्ण जगभर दुर्गबांधणीत प्रगती झाली असे म्हटले जाते. पण भारतात प्राचीन काळातच बरीच प्रगती झालेली दिसून येते. प्रादेशिक संरक्षण व नियंत्रण हे दुर्गांचे प्रधान कार्य. प्रत्येक मार्ग दुर्गांच्या मार्याच्या हल्ल्याखाली असे किंवा त्या मार्गाची सुरक्षितता जवळच्या दुर्गांवर अवलंबून असे. यामुळेच अनेक घाटमार्गांवर दुर्ग बांधल्याचे दिसून येते.
सातवाहनकाळात ( इ.स. पूर्व 230 ते इ.स. 210 ) मोठ्या प्रमाणात दुर्गबांधणी झाली. कातळामध्ये खांब सोडून खोदलेली टाकी व कातळामध्ये खांब सोडून खोदलेली टाकी व कातळामध्येच खोदून काढलेले दरवाजे व मार्ग हे सातवाहन कातळातील दुर्ग बांधणीतील वैशिष्ट्य समजले जाते. पुढे देवगिरीचे यादव व कोल्हापूर येथील शिलाहार राजा भोजच्या काळात दुर्ग उभारणी झाल्याचे उल्लेख मिळतात. यानंतरही सतराव्या शतकापर्यंत दख्खन प्रदेशात मोठ्या प्रमाणात दुर्ग उभारण्यात आले. अनेक सम्राट व राजांनी उभारलेल्या दुर्गांमुळे महाराष्ट्र गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थळदुर्ग व मिश्रदुर्ग यांनी समृद्ध बनला आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा तर दुर्गांचा सुवर्ण काळ ठरला. त्यांनी या दुर्गांचे सामर्थ्य अचूक हेरले व जूने दुर्ग दुरुस्त करीत अनेक नवीन दुर्गांची उभारणी केली. त्यांच्या राज्याचे सार हे दुर्गच, त्यांच्या काळात दुर्गांचा विलक्षण दरारा निर्माण झाला.
दुर्ग, गड, किल्ले, कोट हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. प्राचीन काळी दुर्ग ही एकच संज्ञा वापरीत. पण मध्ययुगात दुर्ग गड किल्ले या शब्दाचा वापर इतका ढिलाईने केलेला आढळतो की नुसता गड, किल्ले, दुर्ग, कोट या शब्दानी संबंधित दुर्ग जलदुर्ग आहे की गिरिदुर्ग की स्थलदुर्ग आहे हे ओळखणे शक्य होत नाही. सिंधुदुर्ग हे जलदुर्ग तसेच जयगड, पूर्णगड हेही जलदुर्ग, सर्जाकोट हा देखील जलदुर्गच. शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजेना पाठविलेल्या पत्रामध्ये एकाच ओळीत अहिवंत दुर्ग व नाहवा गड असा उल्लेख आहे. तसेच इतर पत्रांमध्ये किल्ले राजगड, किल्ले महिपतगड असे उल्लेख आहेत. आज आपण देखील गड, किल्ले, दुर्ग असा भेद न करता एकाच अर्थाने वापरतो.
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment