Total Pageviews

Wednesday, 2 September 2015

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... ! भाग १


छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !
भाग १
मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.

कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते.
अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment