Total Pageviews

Tuesday, 8 September 2015

जिंजीकोटे अर्थात जिंजी गडसमूह भाग २



जिंजीकोटे अर्थात जिंजी गडसमूह!
भाग २
प्रत्येकाला स्वत:ची तटबंदी आहे आणि पुन्हा ते एका मजबूत तटबंदीने एकमेकांशी पूर्वी जोडले गेले होते. पण हमरस्ता काढण्यासाठी ही तटबंदी रस्त्याच्या ठिकाणी तोडावी लागली. जवळजवळच्या डोंगरावरील हे तिन्ही किल्ले मिळून जिंजीचा किल्ला समजला जातो. यापैकी आठशे फूट उंच असलेला राजगिरी हा या तिघांत सर्वात कठीण व अभेद्य समजला जातो. दिंडीवनमला जाणारा हमरस्ता या तिन्ही किल्ल्यांच्या मधूनच काढला आहे. जिंजी हा एकूण किल्ला पाच किलोमीटरच्या परिघात पसरलेला आहे. डाव्या हाताच्या कृष्णगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी तिन्ही किल्ल्यांसाठी एक तिकीट खिडकी आहे, असे दिसल्याने आम्ही तीन मित्रांनी तिकीट खिडकीजवळचाच कृष्णगिरी किल्ला प्रथम पाहायचा असे ठरवलं. उन्हं चढायच्या आधी त्यातील निदान दोन किल्ले तरी पाहून झाले पाहिजेत, हा निर्धार होता म्हणून आम्ही इतक्या लवकर गेलो की, तिकीट देणा-या कारकुनाचीच आम्हाला थोडा काळ वाट पाहवी लागली. आसपास माणसांची काहीच चाहूल दिसत नव्हती, सारं कसं शांत शांत होते. नाही म्हणायला जवळच राहणारा एक म्हातारा खेडूत, काठी टेकत, तोंडातील बाभळीची कांडी चावत ‘ही कोण नवीन मंडळी आली आहेत ते तर बघू’ या उत्सुकतेपोटी एक फेरी मारून गेला.
१६०० सालात विजयनगरच्या राजांनी बांधलेल्या या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी ‘हिंदुस्थानातील अभेद्य किल्ला’ म्हणून गौरवले होते. विजयनगरचे मांडलिक असलेल्या जिंजीच्या नायकांनी सोळाशे ते अठराशे सालात या किल्ल्यावर राज्य केले. त्यांचा राज्यकारभार शांततेत चालला असला तरी अधूनमधून शेजारील मदुराई, वेलूर आणि चंद्रगिरीच्या राज्यकर्त्यांशी त्यांच्या लढाया होत असत. १६७४ मध्ये काही काळ तो विजापूरच्या नबाबांच्या ताब्यात होता. त्या वेळी असताना जिंजी शहर लुटण्यात आले होते. त्या वेळी या किल्ल्याचे नाव होते ‘बादशहाबाद’. जेमतेम सोळा वष्रे विजापूरकरांनी तो सांभाळला, मग मराठय़ांनी तो सर केला. स्थानिक तमिळ लोक त्याला चेंजी म्हणत, तर मराठे त्याला ‘चिन्दी’ म्हणत. १७०० सालाच्या अखेरीस हा किल्ला मोगलांकडे आला. त्या वेळी या किल्ल्याचे ‘नसरतगढ’ असे नामकरण झाले. विजापूरच्या सुलतानांना हरवून १६७७च्या सुमारास शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर याला बळकट करण्यावर त्यांनी लक्ष दिले. औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा राजारामाने याच किल्ल्यावर आश्रय घेतला होता. मोगलांनी सात वष्रे वेढा देऊनही त्यांना तो सर करता आला नाही, इतका तो दुर्गम होता. नंतर १६९८ मध्ये हा किल्ला जिंकण्यात औरंगजेबाला यश आले खरे, पण तोवर राजाराम महाराज निसटले होते. नंतर कार्नाटिक किंवा अरकाडचे म्हटल्या जाणा-या नबाबांकडे तो आला. डुप्लेच्या काळात १७०० मध्ये तो फ्रेंचांनी घेतला. १७६१ मध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पाँडेचरी येथे पराभव करून हा किल्ला सर करण्यापूर्वी काही काळ इथे हैदर अलीचेच राज्य होते.
कृष्णगिरीच्या पायथ्याशी किल्ल्यांचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. तिकिटे घेऊन ऑक्टोबरमधील एका सकाळी आम्ही उत्साहाने कृष्णगिरी या गडाच्या पाय-या चढू लागलो. उतरणीच्या दिशेने नजर टाकली की खाली दिसणारी वा-याबरोबर डोलणारी हिरवीगार भाताची शेतं डोळ्यांना सुखावत होती. मधूनच एखादे वाहन खालील निर्जन रस्त्यावरून दिंडीवनमच्या दिशेने सुसाट पळताना दिसत होते. ऑक्टोबर महिना नुकताच सुरू झाला होता. आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे वातावरणात सर्वत्र सुखद गारवा पसरला होता. गड चढताना वाटेत लागणा-या देवडय़ांतून किंचित विश्रांती घेत आम्ही आता बरेच उंचावर आलो होतो. गडाच्या माथ्यावर एक, दगडात बांधलेली आडवी बैठी इमारत दिसली. ती धान्यकोठाराची होती. हवा येण्या-जाण्यासाठी या कोठाराला उंचावर काही झरोके होते. त्याला लागून तेल साठवणीची एक विहीर आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी दरबाराची, सुंदर घुमट असलेली भग्न इमारत होती. त्याआधी श्रीकृष्ण मंदिर आहे व मंदिराखाली सभागृहासारखी एक इमारत आहे. त्याच्या स्टेजसारख्या दिसणा-या उंचवटय़ाखाली हत्ती, वानरे यांचे छान ठसठशीत वेलबुट्टीचे शिल्पपट्ट (बँड) दिसले. उंचावर गेल्यावर तिथे बरेचसे फोटो काढून आम्ही रस्त्याच्या पलीकडचा राजगिरी पाहण्यासाठी कृष्णगिरी उतरू लागलो.
राजगिरी किल्ल्याचे मूळ बांधकाम कोनार राजवटीतील पहिला आनंद कोन याने १२०० साली केले. मात्र कृष्णगिरी गडाच्या बळकटीचे काम, कृष्ण कोन या नंतरच्या राजाने १२४० मध्ये केले. नंतरच्या वास्तू पुढील काळातील राज्यकर्त्यांनी उभ्या केल्या. राजगिरी किल्ल्यातील घुमटाकार छतं असलेली दोन कोठारे, दारूखाना, ध्वजाची जागा, रंगनाथाचे (कृष्णाचे) देऊळ, सेंजी मातेचे मंदिर-ज्यावरून किल्ल्याला नाव मिळाले-या वास्तू आजही शाबूत आहेत. त्या काळी कल्याण महलसारखी उंच इमारत कशी बांधली असेल याचा विचार करत, बाकीच्या इमारतींकडे फारसे लक्ष न देता वाटेतील शिवमंदिरात नमस्कार करून, आम्ही राजगिरी गड चढायला परत जोमाने सुरुवात केली. या किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारातून आत शिरताना मला बिदरच्या किल्ल्याची आठवण आली. तिथेही, किल्ल्यावर स्वारी करणा-या शत्रूच्या स्वारीचा वेग कमी करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळील सुरुवातीचा मार्ग असाच वळणावळणाचा केला आहे. पुढील मोकळ्या अंगणातून बाहेर पडल्यावर वर जायच्या वाटेच्या कडेला देवदेवतांच्या काही मूर्ती ठेवलेल्या दिसल्या. नंतरची पायऱ्यांची मोठी चढण चढण्यापूर्वी, आम्ही आदल्या रात्री राहिलो होतो, त्या हॉटेलमधून आणलेला पोंगल खाऊन वर छानसे पाणी पिऊन थोडी विश्रांती घेतली.
गडावरील पाण्याची योजना बाकी वाखाणण्यासारखी होती. किल्ल्यावर साठवायच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, याची काळजी पूर्वीच्या लोकांनी घेतली होती. ताजेतवाने झाल्यावर आम्ही परत चढायला सुरुवात केली. तिरूवन्नमलैच्या दिशेला आहे ते अरकाड (अर्कोट नव्हे) गेट. बाकी इतर किल्ल्यावर दिसतात तशी इथेही तळी, जुनी कोठारं होती. वेगळी होती ती कल्याण महल (लग्नमंडप) ही सात मजली इमारत. ही उंच इमारत कृष्णगिरी किल्ल्यावरूनही दिसते. ऐंशी फुटांपेक्षा उंच असलेल्या या किल्ल्यावरील इमारतीचे पिरॅमिडसारखे छप्पर पाहून आम्हाला नवल वाटले. गडावर आता शाबूत असलेल्या, बोटावर मोजण्याइतक्या इमारतींच्या तुलनेत ही उंच इमारत थोडीशी आधुनिक वाटते हे खरे. यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेला उंच-उंच पायऱ्यांचा जिना जुन्या पद्धतीचा असून तो भिंतीतच केला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी थोडी ऊर्जा शिल्लक ठेवायची असल्याने आम्ही त्या इमारतीत शिरलो नाही. उगीच दमछाक का करा, असा मनात विचार केला. आम्हाला आता त्वरा करावी लागली. बालेकिल्ल्यावर पोचण्याआधी चढणीपासून विलग केलेल्या पोकळीवरील पूल पार केला. पूर्वी हा पूल सरकता असावा. मधूनमधून असे अडथळे ठेवून शत्रूला वपर्यंत पोहोचणे अगदी अवघड करून ठेवण्यासाठी ही विशिष्ट रचना असावी. कसेबसे माथ्यावर पोहोचल्यावर खालील विहंगम दृश्य पाहून समाधान वाटले. तेथून कृष्णगिरी किल्ल्याकडे नजर टाकल्यावर इथवर येण्याचे श्रम विसरून गेलो. थकल्या शरीराने पण आनंदी मनाने व समाधानाने खाली उतरून रिक्षाने आम्ही प्रथम जिंजी गावातील जेवणाचे हॉटेल गाठले.
कसे जाल
विमानाने आणि रेल्वेने : चेन्नई-जिंजी दिंडीवनम-माग्रे-१६१ किमी.
जिंजी रेल्वेने जोडलेले नाही.
रस्त्याने : तिरूवन्नमलै-३७ किमी आणि पुडुचेरी
: ६७ किमी.
केव्हा जाल : ऑक्टोबर ते एप्रिल. (छत्री अवश्य नेणे.)
http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment