Total Pageviews

Thursday, 10 September 2015

संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी: भाग 10

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 10
जेधे शकावली प्रमाणे – “शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे पौष व ६ शहा आलम रामघाटे उतरोन कुडाळ व बांदे जाळून घाटावरी फाल्गुन शु पौर्णिमेस गेला लष्कर फार मेले “
तारीखे दिलकुशा प्रमाणे – शहजादा बादशहाचा निरोप घेऊन कोकणच्या रामदरा घाटाच्या दिशेने रवाना झाला. हा घाट पन्हाळगडापासून ३० कोसांवर आहे. रामदरा घाटाखालचा भाग समृद्ध नव्हता मोगल फौजेला अन्नधान्य आणि रसद मिळेनाशी झाली. बादशाहने सागरी मार्गाने रसद पाठवली पण ती जास्त काळ पुरली नाही. मोगली फौजेची दुर्दशा झाली आणि असंख्य माणसे जाय झाली.
शहा आलम सैन्य घेऊन आल्याचे कळताच संभाजी महाराजांनी माघार घेतली. मुघली सैन्य जर ऐनवेळी मदतीस पोचले नसते तर संभाजी महाराजांनी गोवे एकदम खणूनच काढले असते पण नियतीस हे मंजूर नव्हते. शहा आलम जवळ येत होता व पोर्तुगीज आणि मुघल यामधे मराठा सैन्य अडकले असते, आणि यामुळे संभाजी महाराजांनी माघार घेऊन तहाची बोलणी सुरु केली. मुघलांचे सैन्य गोव्यात दाखल होईपर्यंत मराठी सैन्यांनी माघार घेतली होती आणि शके १६०५ पौष शु. पौर्णिमेस संभाजी महाराज रायगडास आले (जे.श)
संभाजी महाराजांच्या सोबत झालेल्या युद्धामधे विजरईस कळून आले की मराठ्यांविरुद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. पोर्तुगीजांकडे आरमार होते. गोवे शहरास तट असून जागोजागी गडगंज बुरुज होते. शहरामधे मोठा दारूखाना होता. नदीच्या मुखावर मुरगाव, आग्वाद, रेइशमागुश, काबू असे किल्ले होते. असे असून देखील विजरईस मराठ्यांच्या भीतीने राजधानी गोवे शहरातून हलवण्याची गरज भासली.(पो.म.सं-११६)
रायगडावर पोचल्यानंतर पोर्तुगीजांसोबत तह करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी कवि कलश यास सोपवली. संपूर्ण गोवे प्रकरणात पोर्तुगीज कागदपत्रामधे कवि कलशाचा उल्लेख कुठेही मिळत नाही पण फक्त तह करण्याच्या वेळी त्याचा उल्लेख मिळतो. हे असे का ? पुराव्या अभावी सांगता येणे मुश्कील आहे .
जेधे शकावली मधे मिळतो तो उल्लेख असा – ” शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे माघ शु कवि कलश अकबरास घेऊन भिमगडाच्या झाडीत गेले फिरंगी यासी सला केला “
प्रस्तुत तहात काय कलमे होती याची माहिती पोर्तुगीज कागदपत्रातुनच प्राप्त होते.
 http://itihasbynikhilaghade.blogspot.com 

No comments:

Post a Comment